दखल : धोकादायक वैद्यकीय कचरा…

आरोग्यसेवेत वापरल्या जाणार्या उपकरणांपासून मोठा कचरा निर्माण होत असतो. त्यापासून विषाणूंचा प्रसार होतो तसेच विषाक्त पदार्थ हवेत, जमिनीत सोडले जातात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मानवी आरोग्य संकटात सापडते.
आरोग्यसेवा ही मानवी आरोग्य जपण्याचे आणि देखभाल करण्याचे काम करते. मात्र, त्यातून निर्माण होणार्या वैद्यकीय कचर्याची समस्या निर्माण झाली आहे. आरोग्यसेवेत वापरली जाणारी शेकडो टन प्लॅस्टिकची उपकरणे आणि साधनांतून निर्माण होणार्या कचर्यांपैकी 85 टक्के कचरा धोकादायक नसतो. तो घरातील कचर्यांप्रमाणेच असतो. पण उर्वरित पंधरा टक्के कचरा हा धोकादायक मानला जातो. या कचर्यामुळे वातावरण दूषित होऊ शकते. संसर्गजन्य, रासायनिक आणि रेडिएशनचा धोका निर्माण होतो. आरोग्यसेवेत वापरण्यात येणार्या वैद्यकीय साधनांंच्या कचर्यांचे सुरक्षितपणे निराकरण करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी योग्य व्यवस्थापनाच्या आधारे उपाय केले तर आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे संभाव्य विपरित परिणाम रोखता येऊ शकतात.
आरोग्यसेवेतील वैद्यकीय कचर्यामुळे निर्माण होणार्या संभाव्य धोक्यात तीक्ष्ण वस्तूंने होणार्या जखमांचा देखील समावेश आहे.
आरोग्य सेवेतील कचर्याचे व्यवस्थापन किंवा त्याचे निर्मूलन करताना परिसरात सोडण्यात येणारी औषधी प्रामुख्याने अँटीबायोटिक्स आणि सायटीटॉक्सिक औषधे तसेच पारा किंवा डायऑक्सिनसारख्या घटकांच्या संपर्कात येणे, विषाणू संशोधन, लसीकरण किंवा कचर्यावर प्रयोग करताना त्यापासून निर्माण होणारे रासायनिक उत्सर्जन, आरोग्य उपकरणांचे निर्मूलन करताना हवेत कण मिसळल्याने होणारे हवेचे प्रदूषण, मोकळ्या जागेत जाळण्यात येणारी निरुपयोगी उपकरणे तसेच वैद्यकीय साधनांचा बेकायदा साठा, उपचार आणि निर्मूलनासाठी वापरण्यात येणार्या विषाणूविरोधी घटकांचा प्रसार, अपुरी आरोग्यसेवा यासारखे असंख्य घटक वैद्यकीय कचर्याला हातभार लावतात. यातही मर्यादित कायद्याची चौकट (धोरण, नियमावली, दिशानिर्देश), आरोग्यसेवेने निर्माण होणार्या वैद्यकीय कचर्याबाबत जनजागृती नसणे, कचर्यांचे व्यवस्थापन योग्यरित्या न होणे, मनुष्यबळाचा अभाव, कचरा व्यवस्थापनाला महत्त्व न देणे यासारख्या बाबींमुळे वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. अनेक देशांत तर यासाठी योग्य नियमदेखील नाहीत किंवा त्यावर देखरेख किंवा नियंत्रण ठेवणारी वेगळी नियामक संस्थादेखील नाही. जगभरात दरवर्षी अंदाजे 16 अब्ज इंजेक्शन दिले जातात. तुलनेने सुई आणि सीरिंज याचा सुरक्षितरित्या निपटारा केला जात नाही. म्हणून जखम होण्याची आणि संसर्गाची जोखीम अधिक होण्याची किंवा त्याचा पुनर्वापर करण्याचा धोका निर्माण होतो.
अलीकडच्या काळात निम्न आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांत कालबाह्य सुई आणि सीरिंजच्या वापरावर निर्बंध आणल्याने लसीकरणाचे प्रमाण कमी झाले. म्हणजेच काही प्रमाणात इंजेक्शन उपकरणांचा पुन्हा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली होती. अशा प्रकारे जनजागृती केली जात असतानाही असुरक्षित मार्गाने इंजेक्शन अजूनही दिले जात आहेत. परिणामी जगभरात 33 हजार 800 जण नवीन एचआयव्ही बाधित, 1.7 दशलक्ष हेपेटायटिस बी संसर्गबाधित आणि 3 लाख 15 हजार जण हेपेटायटिस सी संसर्गबाधित झाले आहेत. कचरा डेपोच्या ठिकाणी साङ्गसङ्गाई करताना तसेच आरोग्य सुविधेच्या दृष्टीने धोकादायक असणार्या कचर्यांची हाताळणी करताना तसेच विच्छेदन करताना अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. या गोष्टी जगभरात अनेक ठिकाणी सर्रास घडतात. प्रामुख्याने निम्न आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांत. सुईचा निपटारा करताना त्यापासून जखम होणे, विषाणू पसरणे यासारख्या गोष्टी होण्याचा अधिक धोका राहतो.
आरोग्यसेवेत वापरल्या जाणार्या उपकरणांपासून तयार होणारा कचरा हा उपचार आणि निर्मूलनाच्या वेळी पर्यावरणात विषाणूंचा प्रसार करणे तसेच विषाक्त पदार्थ सोडत असल्याने अप्रत्यक्षपणे मानवी आरोग्य संकटात सापडते. योग्य रितीने त्याची विल्हेवाट न लावल्याने किंवा योग्यरित्या निर्जंतुकीकरण न केल्याने भविष्यात पाणी, पृष्ठभाग, भूजल यात प्रदूषण होऊ शकते. म्हणूनच वैद्यकीय कचरा कमीत कमी निर्माण व्हावा यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. परिणामी वैद्यकीय कचर्याचे प्रमाण कमी होईल आणि त्याची हाताळणी करण्यात आणि विल्हेवाट लावणे सोयीचे होईल.
वैद्यकीय कचरा किमान पातळीवर आणण्यासाठी पर्यावरणपूरक खरेदी करणे, त्याची कमीत कमी वाहतूक करणे, पर्यावरणपूरक पॅकेजिंग करणे, सुरक्षित आणि व्यवहारिक पातळीवर वापर केल्यानंतर त्याच्यावर पुनर्प्रक्रिया करून अन्य ठिकाणी त्याचा वापर करणे यासारख्या गोष्टींवर भर दिला पाहिजे. आरोग्य सेवेतील कचर्यावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया केल्यास पर्यावरणावर विपरित परिणाम होऊ शकतात आणि धोकादायक रासायनिक घटक बाहेर पडू शकतात. या वस्तूंना पर्यावरणानुसार हाताळले नाही, साठवणूक केली नाही तर त्यावर गंभीर समस्या निर्माण होऊन त्यातून मार्ग काढता येणार नाही.
वैद्यकीय उपकरणांपासून निर्माण होणार्या कचर्यांसाठी सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन सुधारणा योजना राबविणे गरजेचे असून त्यासाठी सरकारने बांधिलकी जोपासणे आणि पाठिंबा देणे गरजेचे आहे. अर्थात, स्थानिक पातळीवर त्यावर तात्काळ मार्ग काढला जाऊ शकतो.





