EPFO 3.0: आता पीएफ क्लेम होणार अधिक वेगवान; प्रादेशिक भाषांसह मिळणार नवीन सुविधा

EPFO 3.0: देशातील कोट्यवधी पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या तंत्रज्ञान प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत असून, लवकरच ‘EPFO 3.0’ हे नवीन व्हर्जन लाँच केले जाणार आहे. या बदलामुळे पीएफशी संबंधित कामे आता बँकिंग प्रणालीप्रमाणेच जलद आणि पारदर्शक होणार आहेत.
काय आहे ‘EPFO 3.0’ प्रोजेक्ट?
EPFO 3.0 हा केवळ तांत्रिक बदल नसून ती संपूर्ण कार्यप्रणाली आधुनिक करण्याची एक मोहीम आहे. याद्वारे नवीन डिजिटल पोर्टल, प्रगत सॉफ्टवेअर आणि ‘कोर बँकिंग सिस्टम’ (CBS) लागू केली जाईल. यामुळे ईपीएफओचे सर्व प्रादेशिक स्तर एकाच केंद्रीय प्लॅटफॉर्मवर येतील.
या नवीन बदलांचे मुख्य फायदे:
देशभरात कुठेही सेवा: सध्या खाते ज्या शहरात आहे, तिथेच कामे अडकून पडतात. मात्र, नवीन प्रणालीमुळे सदस्य देशातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयातून आपल्या खात्याच्या समस्या सोडवू शकतील.
वेगवान क्लेम सेटलमेंट: कोर बँकिंग सिस्टममुळे क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अत्यंत वेगवान होईल. स्थानिक कार्यालयांवरील अवलंबित्व कमी होऊन तांत्रिक त्रुटी दूर होतील.
प्रादेशिक भाषांचा आधार: भाषिक अडथळा दूर करण्यासाठी ईपीएफओ ‘एआय’ (AI) आणि ‘भाषिणी’ प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे. यामुळे आता मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमध्येही कर्मचाऱ्यांना आपल्या खात्याची माहिती आणि नियमावली उपलब्ध होईल.
UPI द्वारे पैसे काढण्याची सुविधा: लवकरच पीएफमधून पैसे काढण्यासाठी UPI चा वापर करता येईल. सुरुवातीला २५ हजार रुपयांपर्यंतची मर्यादा यासाठी निश्चित केली जाऊ शकते.
असंघटित क्षेत्रावरही विशेष लक्ष-
केवळ कॉर्पोरेट क्षेत्रच नाही, तर गिग वर्कर्स (Gig Workers) आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र फंड व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ईपीएफओकडे येऊ शकते, त्यासाठी ही तयारी केली जात आहे.
सध्या ईपीएफओकडे सुमारे ८ कोटी सक्रिय सदस्य असून २८ लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन केले जाते. पुढील १० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन ही नवीन यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे.



