nagar | शिक्षक मतदार संघात राजकीय पक्षांची एंट्री

नगर, (प्रतिनिधी) – विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात शिक्षकांच्या विविध संघटना उमेदवार उभे करत होते. या मतदार संघात शिक्षक आणि संस्था चालकांना उमेदवारी करता येते. आतापर्यंत शिक्षकच उमेदवार विजयी होत होते. मात्र, गेल्या काही निवडणुकीत संस्था चालकच प्रतिनिधीत्व करत आहेत. यंदा तर राजकीय पक्षांनी उडी घेतल्याने या निवडणुकीला पक्षीय स्वरूप आले आहे.
शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) चे या मतदार संघावर वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, यावर्षी राजकीय पक्षांनी या निवडणुकीत एंट्री केल्याने गणिते बदली आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक, डी.एड., बी.एड. आय.टी.आय. अशा विविध व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षक आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षक लोकशाही आघाडीच्या माध्यमातून संघटीत झालेले आहे.
या आघाडीच्या वतीने शिक्षकांसाठी कार्य करणाऱ्या नेत्याला उमेदवारी दिली जात होती. या मतदार संघात मागील सहा पैकी पाच वेळेस आघाडीचा उमेदवार विजयी झालेला आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघात ७० हजार मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २६ हजार मतदार आहेत. अहमदनगर जिल्हा दुसऱ्या क्रमांकांवर असून १७ हजार मतदार आहेत. जळगाव १३ हजार, धुळे साडे आठ तर नंदूरबार ५ हजार मतदार आहेत.
या मतदार संघात २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी ९ उमेदवार आहेत. या मतदार संघात शिक्षक आणि संस्था चालकांना उमेदवारी करता येते. आतापर्यंत शिक्षकच उमेदवार विजयी होत होते. मात्र, गेल्या काही निवडणुकीत संस्था चालकच प्रतिनिधीत्व करत आहेत. यंदा तर राजकीय पक्षांनी उडी घेतल्याने या निवडणुकीला पक्षीय स्वरूप आले आहे.
शिक्षकांचे प्रमुख प्रश्न
जुनी पेन्शन लागू करावी, नवीन शाळांना अनुदान द्यावे, विना अनुदानित शाळेत अनेक ठिकाणी शिक्षकांची पिळवणूक होते, शाळा बाह्य कामे नकोत, पदोन्नती, वैद्यकीय बिले, सेवा पुस्तिका, सेवानिवृत्ती संदर्भातील कामे मार्गी लावण्यात अडवणूक होते.
अहमदनगरचे सर्वाधिक उमेदवार
भागवत धोंडिबा गायकवाड (रा. कासारे, कौठे कमळेश्वर, ता. संगमनेर), अमृत उर्फ अप्पासाहेब रामराव शिंदे (रा. देहरे, ता. नगर), भाऊसाहेब नारायण कचरे (रा. दत्तनगर, पाईपलाइन रस्ता, सावेडी), विवेक बिपीनदादा कोल्हे (कोल्हेवस्ती, येसगाव, ता. कोपरगाव), संदीप वामनराव गुरूळे (मुर्शतपूर, ता. कोपरगाव),
सचिन रमेश झगडे (आढळगाव, ता. श्रीगोंदे), दिलीप काशिनाथ डोंगरे (वडगाव लांडगा, ता. संगमनेर), डॉ. छगन भिकाजी पानसरे ( गणेशनगर, ता. शेवगाव), रणजित नानासाहेब बोठे ( चक्रधरनगर, राहाता, ता. राहाता)





