Dolasnath Temple : डोळसनाथ मंदिरात फुगडी, दांडिया अन् भोंडल्याचा उत्साह
Dolasnath Temple : सरसेनापती उमाबाई दाभाडे शाळेच्या विद्यार्थिनींचा सहभाग

तळेगाव दाभाडे – जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सरसेनापती उमाबाई दाभाडे शाळेच्या १७५ विद्यार्थिनींनी सहभाग घेत फुगडी, दांडिया आणि भोंडल्याची गाणी सादर करत आनंदोत्सव साजरा केला.
मंदिर ट्रस्टच्या वतीने कुमारिका पूजन, भोंडला, दांडिया, फुगडी आणि महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पारंपरिक गाणी आणि खेळांमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना सांस्कृतिक परंपरांची ओळख करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
या कार्यक्रमाला शाळेच्या निकिता शितोळे, प्राची लोमटे, ताहेरा बासडे, सोनाली घाटे, गणेश ठाकरे, माजी नगरसेविका शोभा भेगडे, शर्वरी मखामले, रेखा सरोदे, वैशाली सरोदे, कमल शिंदे, डॉ. लीना कवितके आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर सावंत आणि उषा पानसरे यांच्या वतीने कुमारिकांना शालेय वस्तू भेट देण्यात आल्या. खिरापत, साखरफुटाणे आणि भेळ यांचेही वाटप करण्यात आले. मंजिरी सरोदे यांच्या वतीने प्रसाद म्हणून शिऱ्याचे वाटप करण्यात आले.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात दररोज दुपारी ४ ते ५.३० या वेळेत देवी सप्तशती पाठ होतो. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत भजन, हरिपाठ, देवीचा जोगवा, गाणी, देवीसूक्त, देवी मंत्रजप आणि कालभैरवाष्टक असे धार्मिक कार्यक्रम होतात. सायंकाळी ६.१५ वाजता दीपप्रज्वलन, तर रात्री ८ वाजता आरती केली जाते. सोमवारी (दि. १९) दुपारी १ वाजता नवचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त राजेंद्र सरोदे यांनी दिली.
Ujjwal Nikam: केतन अग्रवाल हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील





