Pankaj Dhir passes away : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. महाभारतामध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. आज 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 मिनिटांनी त्यांचे निधन झाले आहे. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबाबत पंकज धीर यांचे मित्र अभिनेते रहे फिरोज खान यांनी माहिती दिली. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये त्यांनी कर्णाची भूमिका साकारलेली आहे. पंकज यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यावर त्यांनी मात केली होती. पण काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सरचे निदान झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यानांच मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता पंकज धीर यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पंकज धीर हे त्यांच्या भारदस्त आवाजमुळे प्रसिद्ध होते. त्यांनी महाभारतात साकारलेली कर्णाची भूमिका त्यांनी उत्तमप्रकारे वठवली होती. याशिवाय त्यांनी अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. हेही वाचा : “बनावट क्लोजअप अन् इनो… ” ; दिल्लीत दोन कारखान्यांवर छापा, ‘विष’ तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश