Purandar : ढोलांच्या तालात ‘गजेघाय’ खेळाचा आनंद
Purandar :मसनेर देवाच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मसनेर मंदिरामध्ये मेंढपाळ बांधवांनी धनगरी 'गजेघाय' या खेळाने यात्रेमधील शेकडो भाविकांचे लक्ष वेधून घेतले. धनगर समाजाच्या मसनेर देवाच्या यात्रेनिमित्त पहाटेपासून नवस फेडणाऱ्यांनी गूळ, पेढे नारळाचे वाटप केले.

वाल्हे : वाल्हे (ता. पुरंदर) नजिक मदनेवस्ती व कामठवाडी येथील मसनेर मंदिरात मसनेर देवाची यात्रा गुलालाची मुक्त उधळण करीत, “मसनेर देवाचे चागंभलं’ नावाचा गजर करीत यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरामध्ये रात्रभर छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. मंगळवार (दि.२७) सकाळी देवाची विधिवत पूजा करण्यात आली. लंगर तोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आली. सायंकाळी पुन्हा ढोल, ताशा, सनईच्या तालावर गुलालाची मुक्त उधळण करीत ‘मसनेर च्या नावानं चांगभलं’ असा जयघोष करीत गुलालाची मुक्त उधळण करून ढोलांच्या तालात ‘गजेघाय’ खेळाचा आनंद वाल्हे नजिक मदनेवस्ती, व कामठवाडी येथील ग्रामस्थांनी लुटला.
मसनेर देवाच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मसनेर मंदिरामध्ये मेंढपाळ बांधवांनी धनगरी ‘गजेघाय’ या खेळाने यात्रेमधील शेकडो भाविकांचे लक्ष वेधून घेतले. धनगर समाजाच्या मसनेर देवाच्या यात्रेनिमित्त पहाटेपासून नवस फेडणाऱ्यांनी गूळ, पेढे नारळाचे वाटप केले. काहींनी शेडा (देवांच्या मूर्ती) घेऊन मसनेर मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या. काहींनी नवस फेडण्यासाठी मंदिर परिसरामध्ये दंडवत घातले. सकाळी मसनेर मंदिरामध्ये गुलालाची मुक्त उधळण करीत पारंपरिक ढोलांच्या तालावर छबिना पार पडला. दुपारी मसनेर देवाची समाज आरती झाल्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिराबाहेरील प्रांगणामध्ये गुलालाची मुक्त उधळण करीत ‘गजेघाय’ नृत्याने खेळाला चांगलाच रंग भरला होता. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनीही ‘गजेघाय खेळा’ मध्ये सहभागी होत धनगर समाज बांधवांसह छबिन्यात ठेका धरल्याने खेळाला चांगलाच रंग भरला होता.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, सरपंच अतुल गायकवाड, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, अमोल खवले, पिसुर्टी माजी सरपंच अशोक बरकडे, उपसरपंच सागर भुजबळ, तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भुजबळ, दादासाहेब मदने, उद्योजक गोरख कदम आदींनी मसनेर देवाचे दर्शन घेतले.
युवकांचा मोठा सहभाग
दरम्यान, युवकवर्ग मोठ्या संख्येने छबिन्यामध्ये सहभागी झाले होते. यात्रेसाठी वाल्हे, पिसुर्टी, नीरा, दौंडज, तरसदरा, पिंगोरी, थोपटेवाडी, गुळुंचे, जेऊर, सुखेड, लोणंद, अंदोरी आदींसह अनेक ठिकाणच्या हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी मंदिर परिसरात हार-फुले, पेढे, खेळणी विकणाऱ्यांची गर्दी झाली होती.





