#ENGvIND 1st T20 : भारतासमोर विजयी सलामीचे आव्हान

साउदम्पटन – कसोटीत पराभूत झालेल्या भारतीय संघाची आजपासून मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडशी गाठ पडणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा संघात परतल्यामुळे भारताची फलंदाजी जास्त सशक्त बनली असली तरीही यजमान इंग्लंडचा संघ तुफान भरात असल्यामुळे भारतीय संघासमोर विजयी सलामी देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत
ठिकाण – साउदम्पटन
वेळ – रात्री 10.30 वाजल्यापासून
(भारतीय प्रमाण वेळेनुसार)
थेट प्रक्षेपण – सोनी स्पोर्टस
करोनातून पूर्ण बरा होत संघात परतलेला रोहित कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहणार आहे. त्यातच पहिल्या टी-20 सामन्यासाठी माजी कर्णधार विराट कोहली व यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. हे प्रमुख खेळाडू नंतरच्या दोन सामन्यांसाठी संघात परतणार आहेत.
आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयी झालेल्या भारताच्या टी-20 संघात या दोनव्यतरिक्तफार मोठे बदल होणार नसल्याचेही दिसत आहे. भारताची फलंदाजी कागदावर तरी वरचढ दिसत असली तरी प्रत्यक्ष सामन्यात ते कशी कामगिरी करतात याकडे लक्ष राहणार आहे. सलामीला इशान किशन चांगला खेळत असला तरीही ऋतुराज गायकवाडच्या अपयशाचीच संघाला चिंता आहे. संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा प्रचंड भरात असल्यामुळे गायकवाडच्या जागी सॅमसनची वर्णी लागू शकते. तसेच रोहित संघात परतल्यामुळे तोच किशनसह डावाची सुरुवात करेल, अशा स्थिती सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल.
मधल्या फळीत दिग्गज फलंदाज असल्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे. मात्र, फारसा सराव करण्याची संधी न मिळाल्यामुळे रोहितची बॅट काय चमत्कार करेल याचीच उत्कंठा आहे. इंग्लंडची फलंदाजी पाहता त्यांचे सर्वच फलंदाज भरात आहेत. त्यातच कसोटीच्या दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा जॉनी बेअरस्टो भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.
इतकेच नव्हे तर आयपीएल स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणारा जोस बटलर भारताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवणार व पहिल्या सहा षटकांच्या पॉवर प्लेमध्येच मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. त्यामुळे अनुभवी भुवनेश्वर कुमारवर जास्त मदार राहणार आहे. त्याच्या जोडीला आवेश खान, उमरान मलिक व हर्षल पटेल व अर्शदीप सिंग यांच्यापैकी दोन गोलंदाज असतील. वेगाचा विचार करता उमरानला तसेच फलंदाजीतही चमक दाखवल्यामुळे हर्षल पटेलला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.
ही मालिका तीन टी-20 सामन्यांची असून त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे. तसेच पुढील काळात भारतीय संघाला सातत्याने मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिका खेळायच्या असल्याने संघात सातत्याने बदल तसेच वेगवेगळे प्रयोगही होऊ शकतात, जेणेकरून नवोदितांना जास्तीत जास्त संधी मिळेल.
रोहितवरच लक्ष….
कसोटी सामन्यापूर्वी करोनाची बाधा झालेला रोहित शर्मा आता पूर्ण तंदुरुस्त ठरल्यामुळे या मालिकेत खेळणार आहे. मात्र, केवळ दोनच दिवसांपूर्वी तो येथे दाखल झाल्यामुळे त्याला सरावाला फार वेळ मिळालेला नाही. अशा स्थितीत नेटमध्ये केवळ काही काळ सराव केल्यानंतर प्रत्यक्ष सामन्यात रोहित काय कामगिरी करेल, याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यालाही आयपीएल स्पर्धेपासून अपयशाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे या मालिकेद्वारे भरात येण्याची त्यालाही संधी आहे.


