#ENGvIND 3rd ODI : पंड्या, चहलने इंग्लंडला रोखले, भारतासमोर विजयासाठी….

मॅंचेस्टर – हार्दीक पंड्या, यजुवेंद्र चहल, महंमद सिराज व रवींद्र जडेजा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडला 259 धावांवर रोखले.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत इंग्लंडला पहिल्यांदा फलंदाजी दिली. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी संघात आलेल्या सिराजने आपली निवड सार्थ ठरवताना जॉनी बेअरस्टो व ज्यो रूट यांना बाद करत संघाला थाटात सुरूवात करुन दिली. त्यावेळी इंग्लंडची 2 बाद 12 अशी बिकट स्थिती बनली होती.
सलामीवीर जेसन रॉयने बेन स्टोक्सच्या साथीत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 31 चेंडूत 7 चौकारांसह 41 धावांवर स्थिरावलेल्या रॉयला पंड्याने तंबूत धाडले. पाठोपाठ स्टोक्सही 29 चेंडूत 4 चौकारांसह 27 धावा करुन पंड्याच्याच गोलंदाजीवर परतला. त्याचवेली जोस बटलरने मोईन अलीला साथीला घेत डाव तर सारवलाच परंतू मोठ्या धावसंख्येचा पायाही रचला. अलीने अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात 44 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारंसह 34 धावांवर चांगला खेळत असताना आपली विकेट बहाल केली.
दरम्यान, बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने लियाम लिव्हिंगस्टोनच्या साथीत आक्रमक फलंदाजी केली. पंड्यानेच त्याला तंबूचा रस्ता दाखऴला. त्याने 31 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 27 धावांची खेळी केली. 80 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह 60 धावांची खेळी करणारा बटलरही पंड्याच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर क्रेग ओव्हरटर्नने डेव्हीड विलीच्या साथित संघाला अडीचशे धावांचा पल्ला पार करुन दिला.
ओव्हरटर्नने 33 चेंडूत 32 धावांची खेळी करताना 1 चौकार व 1 षटकार फटकावला. विलीने 15 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह 18 धावा केल्या. चहलने इंग्लंडचे शेपूट गुंडाळताना 3 गडी बाद केले. पंड्याने सर्वाधिक 4 गडी बाद केले. सिराजने 2 तर जडेजाने 1 बळी घेतला. इंग्लंडचा डाव 46 व्या षटकांत 259 धावांवर संपूष्टात आला.
संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड – 45.5 षटकांत सर्वबाद 259 धावा. (जोस बटलर 60, जेसन रॉय 41, मोईन अली 34, क्रेग ओव्हरटर्न 32, बेन स्टोक्स 27, लियाम लिव्हिंगस्टोन 27, डेव्हीड विली 18, हार्दीक पंड्या 4-24, यजुवेंद्र चहल 3-60, महंमद सिराज 2-66, रवींद्र जडेजा 1-21).





