England ODI Squad : भारत-इंग्लंड वनडे मालिकेसाठी संघ जाहीर! रोहित-विराटच्या आगमनाने इंग्लंडमध्ये मोठी उत्सुकता, पाहा संपूर्ण संघ
England ODI Squad : या टी-२० मालिकेपाठोपाठ उभय संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे.

IND vs ENG ODI Series 2026 England Squad Announce Harry Brook captain : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, दोन्ही देशांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. ४ जुलै रोजी मँचेस्टर येथे दुसरा टी-२० सामना होणार आहे. टी-२० मालिकेपाठोपाठ उभय संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या महत्त्वाच्या वनडे मालिकेसाठी ‘इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डा’ने आपल्या बलाढ्य संघाची घोषणा केली आहे. टी-२० प्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा हॅरी ब्रूक याच्याकडेच सोपवण्यात आली आहे.
बटलर, सॅम आणि जो रूटचा संघात समावेश –
इंग्लंडने जाहीर केलेल्या वनडे संघात जोस बटलर, आदिल रशीद, सॅम करन, जो रूट आणि विल जॅक्स यांसारख्या दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना स्थान दिले आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे. एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्व शुबमन गिल करणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या संघात दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंडमध्ये सध्या या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत असून, ते मैदानात कधी उतरणार याकडे इंग्लिश चाहत्यांचे डोळे लागले आहेत.
१४ जुलैपासून रंगणार वनडेचा थरार –
16 players for our 3-match ODI series with India!
Click below for the full squad 👇
— England Cricket (@englandcricket) July 3, 2026
टी-२० मालिकेचा शेवटचा सामना ११ जुलै रोजी खेळवला जाईल. त्यानंतर १४ जुलैपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. जे खेळाडू फक्त वनडे मालिकेसाठी निवडले गेले आहेत, ते लवकरच इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत.
- पहिला वनडे सामना: १४ जुलै
- दूसरा वनडे सामना: १६ जुलै
- तिसरा आणि अंतिम सामना: १९ जुलै
इंग्लंडचा वनडे संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, जो रूट, जोश टंग.
भारताचा वनडे संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.





