मोबाइलचा वापर कमी कर, अभ्यासात लक्ष दे ! म्हणणाऱ्या पित्यावर कुऱ्हाडीने केले सपासप वार

बुलढाणा – मोबाइलचा वापर कमी कर, अभ्यासात लक्ष दे म्हणणाऱ्या पित्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत हत्या केली आहे. गंजानन संपत गवई वय ५५ असे हत्या करण्यात आलेल्या वडिलांचे नाव असून शुभम गवई वय २१ असे आरोपी मुलाचे नाव आहे. शुभम यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हा प्रकार बुलढाणा शहारातील समतानगर परिसरात घडला आहे. २१ वर्षीय शुभम अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्याला मोबाइल आणि सोशल मीडियाचे प्रचंड व्यसन होते. मोबाईलचा वापर कमी कर, अभ्यासात लक्ष दे असे आई-वडिलांकडून वारंवार सांगितले जात असे. यामुळे शुभमची चिडचिड होत असायची. यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलत आपल्या जन्मदात्या पित्याला संपविले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना घडल्या घडल्या गवई यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. मात्र रक्तप्रवाह अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. गवई हे अमडापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते आपली पत्नी आणि मुलगा शुभमसह एकत्र राहात होते. मृत गवई यांचा शुभम हा एकुलता एक मुलगा होता. त्यांना अन्य् चार मुली असून त्या विवाहित आहेत.
आरोपी मुलगा शुभम हा मानसिक रुग्ण असून मागील काही काळापासून त्याच्यावर मानसिक उपचार केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
करोनो महामारीमुळे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परिणामी शाळा महाविद्यालये सु्द्धा बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जास्तीत-जास्त वेळ हा मोबाईल बघण्यात जात आहे. मुले मोबाईलच्या जास्त व्य़सनाधीन झाल्यामुळे अशा घटना घडत आहेत.





