पुणे | अभियांत्रिकी प्रवेश दि. १० जुलैपासून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी (बी.ई आणि बी.टेक) अभ्यासक्रमाचे प्रवेश दि. १० जुलैपासून, तर एमसीएची प्रवेश दि. ६ जुलैपासून सुरू होत आहेत.
राज्य सीईटी सेलमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. त्यापूर्वी सीईटी सेलकडून सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी घेण्यात आली. त्याचा निकालही जाहीर करण्यात आला.
पण प्रत्यक्षात प्रवेशप्रक्रिया सुरु होत नव्हती. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या सर्व पार्श्वभूमीवर प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाल्याने पालकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
तंत्रशिक्षणच्या प्रवेशाच्या तारखा
एमसीएची ६ जुलैपासून, एमबीए, एमई, एमटेक आणि मास्टर आॅफ अर्किटेक्चरचे प्रवेश ९ जुलैपासून, बीई/बी.टेक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १० जुलैपासून, बी. फार्म/ डी. फार्म, हाॅटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची ११ जुलैपासून, बॅचरल आॅफ डिझाइन १२ जुलैपासून, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश आणि थेट द्वितीय वर्ष फार्मसी प्रवेश १६ जुलैपासून सुरु होणार आहेत.
उच्च शिक्षण विभाग प्रवेश
पाच वर्ष विधी अभ्यासक्रम, बीए-बीएस्सी बीएड, बीएड-एमएड प्रवेश ८ जुलैपासून, तीन वर्षीय विधी अभ्यासक्रम १० जुलैपासून, बीपीएड,एमपीएड ११ जुलैपासून, तर बीएड आणि एमएड प्रवेश १२ जुलैपासून सुरु होणार आहेत.





