पुणे | अभियांत्रिकी प्रवेशाच्या ५१ हजार जागा रिक्तच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून, दोन दिवसांपूर्वी प्रवेशाची तिसरी फेरी पूर्ण झाली. तिसऱ्या फेरीअखेर देखील अभियांत्रिकीच्या तब्बल ५० हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.
रिक्त जागांसाठी आता आणखी एक विशेष कॅप फेरी होणार असून, त्यानंतर उर्वरित रिक्त जागांसाठी संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
यंदा राज्यात अभियांत्रिकी प्रवेशासाठी १ लाख ६४ हजार ३३६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी तिसऱ्या फेरीअखेर १ लाख १२ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे अद्याप ५१ हजार ३५५ जागा रिक्त राहिल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र जास्ती जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटला आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहात होत्या.
आयटी क्षेत्रातील नोकरीत मिळणारे मोठे पॅकेज आणि व्यापक संधी लक्षात घेता अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून संगणक विषयाशी निगडित शाखेच्या प्रवेश क्षमतेत सातत्याने वाढ होत होती.
सद्यःस्थितीत आयटी, कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॉण्ड डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, सायबर सिक्युरिटी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि त्यासंबंधित शाखांना सर्वाधिक जागा असून, त्याच शाखांकडे विद्यार्थ्यांचाही अधिक कल असल्याचे आढळून आले आहे. राज्यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या यंदा ४६ हजार २९० जागा उपलब्ध असून,
तिसऱ्या फेरीअखेर त्यामध्ये ३३ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्याने तयार झालेल्या शाखेच्या प्रवेशासाठी यंदा १८ हजार ६६८ जागा उपलब्ध असून, त्यातील १३ हजार ५३१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.




