Vijay Devarakonda Car Accident : दक्षिण भारतीय सिनेमातील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या साखरपुड्याच्या चर्चेने सोशल मीडिया तापले असतानाच, विजयला दोनच दिवसांत अपघाताचा धक्का बसला. सोमवारी (ता. ६) हैदराबादकडे जाताना त्याच्या कारला बोलरो गाडीने धडक देऊन अपघात झाला. सुदैवाने हा अपघात किरकोळ होता आणि विजय देवरकोंडा किंवा त्याच्यासोबत असलेल्या कुटुंबाला कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेने चाहत्यांमध्ये काळजी निर्माण झाली होती, पण विजयने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून ‘सर्व काही ठीक आहे’ असं आश्वासन दिलं. नेमकं काय घडलं? विजय देवरकोंडा रविवारी (५ ऑक्टोबर) भाऊ आनंद देवरकोंडा आणि पालकांसोबत आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथे श्री सत्य साई बाबा मंदिराला गेला होता. सोमवारी हैदराबादला परतताना तेलंगणातील जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील उंडवली परिसरात अपघात घडला. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बोलरो गाडीने अचानक उजवीकडे वळण घेतल्याने विजयच्या लेक्सस कारला मागून धडक बसली. कारच्या मागच्या भागाचं थोडं नुकसान झालं, पण जीवितहानी किंवा गंभीर जखम झाली नाही. अपघातानंतर विजयने मित्राच्या गाडीतून प्रवास पुढे चालू ठेवला, तर त्याचा चालक अंधे श्रीकांत याने उंडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न हा अपघात विजय-रश्मिकाच्या साखरपुड्याच्या बातम्यांनंतरच घडला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आणखी काळजी वाढली. ३ ऑक्टोबरला हैदराबादमधील खासगी समारंभात दोघांनी साखरपुडा केल्याची बातमी समोर आली. विजयच्या टीमने हे कन्फर्म केलं असून, फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न होणार असल्याचं सांगितलं. पुट्टपर्थी दौरा हा साखरपुड्यानंतरचा कुटुंबीयांसोबतचा धार्मिक दौरा असल्याचं बोललं जातंय.