ENG vs SL 2nd Test : आजपासून लॉर्ड्स कसोटीला सुरुवात, दोन्ही संघात महत्वपूर्ण बदल…

England vs Sri Lanka 2nd Test, 2024 :- इंग्लंड व श्रीलंका यांच्या दरम्यान दुसऱ्या कसोटी लढतीला आजपासून (29 आॅगस्ट,दुपारी 3.30 वाजता) सुरुवात होणार आहे. तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका संघ इंग्लंड दौऱ्यावर आला होता. यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या जो रूटने दुसऱ्या डावात झुंजार अर्धशतकी खेळी करताना इंग्लंड संघाला विजय मिळवून दिला होता.
दुसरी लढत लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर रंगणार आहे. ही कसोटी लढतीत इंग्लंडचे पारडे जड वाटत असले तरी इंग्लंडचा संघ खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा मार्क वूड जखमी झाला होता. त्याऐवजी ऑली स्टोनचा समावेश करण्यात आला आहे. हा एकमेव बदल इंग्लंड संघात होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे श्रीलंकेने देखील आपली प्लेइंग-11 जाहीर केली आहे. पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर लंकेला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणे भाग पडले आहे. श्रीलंकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. कुसल मेंडिसला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जागी पथुम निसांकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर विश्व फर्नांडोच्या जागी लाहिरू कुमाराला संधी देण्यात आली आहे.
मागील पाच कसोटीमध्ये इंग्लंड संघाने एक पराभव व सलग चार विजय मिळविले आहेत. श्रीलंका संघाने मागील पाच कसोटीमध्ये 3 विजय व 2पराभव स्वीकारले आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या कसोटी लढतीत इंग्लंडचे जो रूट, बेन डंकेट, शोएब बशीर हे तर श्रीलंका संघाकडून दिमुथ करुणारत्ने, प्रभात जयसूर्या धनंजया डिसिल्व्हा हे खेळाडू महत्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज असतील.





