ENG vs PAK 1st Test (Day 4,Stumps) : पाकिस्तान घरच्या मैदानावर पराभवाच्या उंबरठ्यावर, ब्रुक-रूटच्या खेळीनंतर गोलंदाजांनी केला कहर…

ENG vs PAK 1st Test (Day 4) : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. मुलतान कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने नेत्रदीपक कामगिरी केली. जो रुट आणि हॅरी ब्रूकच्या उत्कृष्ट फलंदाजीनंतर इंग्लिश गोलंदाजांचा कहर पाहायला मिळाला. इंग्लंडने आपला दुसरा डाव 8 बाद 823 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला पहिल्या डावाच्या आधारे 267 धावांची आघाडी मिळाली. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या 6 बाद 152 धावा इतकी झाली आहे. पहिल्या डावाच्या आधारे पाकिस्तान इंग्लंडपेक्षा 115 धावांनी मागे आहे, मात्र यजमान संघाचे 6 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. आता इंग्लंडला पाचव्या दिवशी फक्त 4 विकेट्स काढायच्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही घरच्या मैदानावर पराभवाच्या उंबरठ्यावर पोहचले आहे.
ब्रूकचे तिहेरी तर रूटचे द्विशतक…
तत्पूर्वी, चौथ्या दिवशी जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना घाम फोडला आणि संघाची धावसंख्या 800 पार नेली. इंग्लंडची सात बाद 823 धावा ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच इंग्लंड कसोटी क्रिकेटमध्ये तीन वेळा 800 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला संघ ठरला आहे. यादरम्यान इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 322 चेंडूत 29 चौकार अन् 3 षटकारासह सर्वाधिक 317 धावांची खेळी केली. यासह ब्रूक इंग्लंडकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा सहावा फलंदाज ठरला. तसेच पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला.
Salman Ali Agha and Aamir Jamal stay unbeaten at the close of play as Pakistan trail by 115 runs 🏏#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/wYBrarvopO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 10, 2024
जो रूटने देखील दुहेरी शतक लगावले. त्यानं 375 चेंडूत 17 चौकारासह 262 धावा केल्या. याव्यतिरिक्त जॅक क्रॉलीने 85 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 78 धावांची तर बेन डकेटने 75 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 84 धावांची खेळी केली. यादरम्यान पाकिस्तानकडून पहिल्या डावात नसीम शाह आणि सॅम अयुबने प्रत्येकी 2 बळी घेतले. तर शाहीन शाह आफ्रिदी ,आमेर जमाल आणि आगा सलमानने प्रत्येकी 1 बळी घेतला.
पाकिस्ताच्या गोलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम….
पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या गोलंदाजांच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला. या सामन्यात पाकिस्तानकडून 7 खेळाडूंनी गोलंदाजी केली. यापैकी 6 जणांनी 100 किंवा त्याहून अधिक धावा दिल्या. आतापर्यंत, कसोटी क्रिकेटमध्ये असे एकदाच घडले आहे, जेव्हा संघाच्या 6 गोलंदाजांनी 100 किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत. यापूर्वी असा नकोसा विक्रम झिम्बाब्वेच्या गोलंदाजांच्या नावावर होता, जेव्हा 2004 मध्ये बुलावायो येथे त्यांच्या 6 गोलंदाजांनी 100 किंवा त्याहून अधिक धावा दिल्या होत्या.
दुसऱ्या डावात पाकचे फलंदाज अपयशी…
दुसऱ्या डावात पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर ख्रिस वोक्सने अब्दुल्ला शफीकला बाद केले. यानंतर कर्णधार शान मसूद 11 धावा करून माघारी परतला. तर बाबर आझम 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. सौद शकील 29 तर यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान 10 धावा करून बाद झाला. सध्या पाकिस्तानकडून आगा सलमान आणि आमेर जमाल क्रीझवर(खेळपट्टी) आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आघा सलमान नाबाद 41 तर आमेर जमाल नाबाद 27 धावा करून माघारी परतले.
इंग्लंडसाठी आतापर्यंत गस ॲटिकसन आणि बेर्डन केअर्स हे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरले आहेत. गस ऍटकिसन आणि बेर्डन केअर्सने 2-2 फलंदाज बाद केले. याशिवाय ख्रिस वोक्स आणि जॅक लीच यांना 1-1 असे यश मिळाले.
पाकचा पहिला डाव 556 वर संपुष्टात…
दरम्यान, दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव 149 षटकांत 556 धावांवर आटोपला होता. यादरम्यान पहिल्या डावात पाकिस्तानकडून 8व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आघा सलमानने शतक झळकावले, तर त्याच्याआधी कर्णधार शान मसूद आणि सलामीवीर फलंदाज अब्दुल्ला शफीक यांनीही शतके झळकावली होती. सलमान आघाने 119 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी खेळली. तर कर्णधार शान मसूदने 151 तर अब्दुल्ला शफीकने 102 धावा केल्या. या सामन्यात बाबर आझमची बॅट चालली नाही आणि त्याने 81 चेंडूत 33 धावांची खेळी केली.
इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक 3 बळी घेतले. लीच व्यतिरिक्त इंग्लंडकडून गस ऍटकिन्सन आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी दोन, तर ख्रिस वोक्स, शोएब बशीर आणि रूट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





