ENG vs PAK 1st Test (Day 1 Stumps) : मसूद-अब्दुल्लाची शतकी खेळी, पहिल्या दिवसाच्या खेळावर पाकिस्तानचं वर्चस्व….

Pakistan vs England 1st Test Day 1 Highlights : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. पहिला सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पाकिस्ताननं कर्णधार शान मसूद आणि सलामीवीर अब्दुल्ला शफीक यांच्या शानदार शतकांच्या जोरावर दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात चार बाद 328 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सौद शकील 35 धावांवर तर नसीम शाह खाते न उघडता खेळपट्टीवर खेळत होते.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि पाचव्या षटकात 8 धावसंख्येवर गस ऍटकिन्सनने सॅम अयुबला (04) यष्टिरक्षक स्मिथकडे झेलबाद करून इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. सुरुवातीच्या धक्क्यानंतर अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार शान मसूद यांनी दुसऱ्या विकेटसाठी 253 धावांची शानदार भागीदारी करत पाकिस्तानला मजबूत स्थितीत पोहचवलं. गस एटकिंनसन याने अब्दुल्ला शफीकला ओली पोपकरवी झेलबाद करत ही भागीदारी तोडली. अब्दुल्ला शफीक 184 चेंडूत 102 धावा करून बाद झाला.
Solid centuries from Abdullah and Shan highlight our batting performance today 🏏
Pakistan finish Day 1 at 328-4.#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/WOVEBrAKZr
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 7, 2024
त्यानंतर लगेचच म्हणजे संघाची धावसंख्या 263 असताना जॅक लीचने कर्णधार शान मसूदला आपला बळी बनवून पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. मसूदने 177 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 151 धावा केल्या. त्यानंतर माजी कर्णधार बाबर आझमने शकीलसोबत 61 धावांची भागीदारी रचली, मात्र दिवसाचा खेळ संपण्याच्या काही वेळाआधी पाकची धावसंख्या 324 असताना ख्रिस वोक्सने बाबरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
बाबर आझमने 71 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. त्यानंतर पाकच्या चार बाद 328 झाल्या असताना खेळ थांबविण्यात आला. पाकच्या कर्णधारपदातून मोकळा झाल्यानंतर फक्त फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करणार असल्याचं बाबरनं सांगितलं होतं. पण या सामन्यातही तो काही खास करू शकला नाही.
इंग्लंडकडून ऍटकिन्सनने पहिल्या दिवशी दोन विकेट घेतल्या. त्यानं 15 षटक टाकताना 70 धावा दिल्या. तर वोक्स आणि लीचला प्रत्येकी एक विकेट मिळाली. वोक्सनं 15 षटक टाकताना 58 तर लीचनं 21 षटक टाकताना 61 धावा दिल्या. फिरकीपटू शोएब बशीरनं 18 षटके टाकताना 71 धावा दिल्या पण त्याला विकेट घेण्यात अपयश आलं. आता दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा तसेच इंग्लडंचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.





