ENG vs AUS 2nd ODI : इंग्लंडच्या आदिल रशीदचे अनोखं द्विशतक, कुंबळेसह मुरलीधरनला टाकले मागे…

ENG vs AUS 2nd ODI (Adil Rashid) : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 एकदिवसीय सामन्यांचा दुसरा सामना लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 270 धावांवरच मर्यादित राहिला. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज ब्रेडन कारसेने 3 तर लेगस्पिनर आदिल रशीदने 2 बळी घेतले. यासह आदिल रशीदने वनडे क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण केले आहेत. यासोबतच त्याने अनिल कुंबळे आणि मुथय्या मुरलीधरन यांना एका खास बाबीत मागे टाकले आहे.
आदिल रशीदने केला मोठा पराक्रम…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेतल्यानंतर, आदिल रशीद हा सर्वात कमी डावात 200 विकेट्स पूर्ण करणारा वनडे क्रिकेट इतिहासातील तिसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याने अनिल कुंबळे आणि मुथय्या मुरलीधरनला मागे टाकले आहे. या यादीत पाकिस्तानचा सकलेन मुश्ताक पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने वनडेमध्ये 101 डावात 200 विकेट घेतल्या होत्या. यानंतर शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 124 डावात ही कामगिरी केली. तर आदिल रशीदने 131 डावात ही कामगिरी केली आहे.
Adil Rashid becomes the third fastest spinner to 200 ODI wickets 🤩 pic.twitter.com/a5W1332zJE
— Sky Sports Cricket (@SkyCricket) September 21, 2024
सर्वात कमी डावात 200 बळी घेणारे फिरकीपटू
1. सकलेन मुश्ताक (पाकिस्तान) 101 डाव
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) 124 डाव
3. आदिल रशीद (इंग्लंड) 131 डाव
4. अब्दुर रज्जाक (बांगलादेश) 140 डाव
5. अनिल कुंबळे (भारत) 144 डाव
6. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) 144 डाव
आणखी एक गाठली टप्पा…
आदिल रशीद एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळी घेणारा इंग्लंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जेम्स अँडरसनच्या नावावर आहे. त्याने 194 सामन्यात 269 विकेट घेतल्या आहेत. या यादीत डोरीन गफ दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 234 विकेट घेतल्या आहेत. तर आदिल रशीद तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 201 विकेट घेतल्या आहेत.




