उर्जामंत्र्यांचे विरोधकांना ‘लॅविश’ प्रत्युत्तर; म्हणाले,’मला….’

मुंबई – सर्वसामान्य जनता करोनाच्या निर्बंधांबरोबर वाढत्या महागाईला तोंड देत असताना थकीत विज बिलासाठी मदत मिळेल अशी आशा सरकारने दाखवली. मात्र, त्यावर सरकारने घोर निराशाच केली. काही हप्ते करून विजबील भरण्यास मुभा देणे गरजेचे असताना थेट कनेक्शन कट केली जात आहेत. तर दुसरीकडे मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांवर कोट्यावधींचा खर्च होत असल्याचा आरोप भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी केला आहे. यासोबत ट्विटरवर काही फोटोही शेअर केले आहेत.
सरकारकडे पैसे नाही म्हणतात, गरीब शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कापतात, करोना योध्यांना पगार देत नाही मात्र ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे सरकारी ऑफिस व बंगल्यावर जाऊन पहा कसे पैसे उधळतात, अशा टीका विश्वास पाठक यांनी केली आहे. तसेच राज्यात सामान्यांच्या घरची वीज तोडली जात असताना उर्जामंत्र्यांच्या अलिशान घरावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे असा आरोप भाजपने केला होता. यावर आता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले नितीन राऊत ?
‘माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्यावेळीही मी खर्च करु शकत असल्याने असाच रहायचो. मला चांगलं राहायला आवडतं. आताही मी नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही
ते पुढे म्हणाले,’सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे. लोकांना जे समजायचं ते समजावं. माझं किचन बघा हे लॅविश आहे का? माणसाने लॅविश राहू नये का? लोकांना वाटतं मी ऊर्जा खात्यात काम करतो, ते लोकांना सलत आहे त्यामुळे त्यांना तिरस्कार वाटतो, त्यांच्या पोटात जळत आहे.’





