Naxalites killed – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार मारण्यात यश आले आहे. ही चकमक कुकानार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसगुना गावातील जंगलात झाली. यात एका महिलेसह दोन नक्षलवाद्यांचा म्होरक्याचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, या भागात नक्षलवादी असल्याची गुप्तचर माहिती मिळाली. यानंतर पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षक आणि कुकानार पोलीस पथकाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात सापळा रचळा. यावेळी दुपारी २ वाजल्यापासून सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत एका महिलेसह दोन नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. तसेच घटनास्थळावरून एक इन्सास रायफल, १२ बोअर रायफल, इतर शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार मृत नक्षलवाद्यांपैकी एक जण पेदारस गावचा स्थानिक संघटना पथकाचा कमांडर होता, ज्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सुकमा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरपुंजे शहीद झाले होते.