Encounter in Jammu । जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट सुरक्षा दलांनी हाणून पाडला. दरम्यान, अजूनही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू आहे. ही पोस्ट राजौरीतील गुंडा खवास भागात आहे. जम्मू भागात गेल्या काही महिन्यांत दहशतवादी कारवाया वाढताना दिसून येत आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. या भागात घुसखोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. जम्मूमधील दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अनेक मोठे ऑपरेशनही सुरू केले आहेत. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी येथे उच्चस्तरीय संयुक्त सुरक्षा आढावा बैठक घेतली. या बैठकीला सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक, गुप्तचर संस्थांचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. सावध आणि नियोजनबद्ध दहशतवादविरोधी अभियान सुरू Encounter in Jammu । यादरम्यान, लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले होते की, दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा खात्मा करण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय साधून आपण सावध आणि नियोजनबद्ध दहशतवादविरोधी अभियान सुरू केले पाहिजे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, असे निर्देशही सिन्हा यांनी दिले. जम्मूत 50 दहशतवादी सक्रिय Encounter in Jammu । गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी अलीकडेच सांगितले होते की जम्मू भागात सुमारे 50 दहशतवादी सक्रिय आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी भारत सरकारने 500 पॅरा कमांडो जम्मूला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले होते. यापूर्वी 14 जुलै रोजी कुपवाडा येथे नियंत्रण रेषेवर तीन सशस्त्र दहशतवादी मारले गेले होते.