Gunmaaster G9 Trailer : इम्रान हाश्मी पुन्हा अॅक्शन मोडमध्ये! ‘गनमास्टर जी९’चा धमाकेदार ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला
Gunmaaster G9 Trailer : दमदार अॅक्शन सीन्ससोबतच चित्रपटात एक भावनिक प्रेमकथाही उलगडणार असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते.

Gunmaaster G9 Trailer : ‘आवारापन २’नंतर अभिनेता इम्रान हाश्मीच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर त्याच्या आगामी ‘गनमास्टर जी९’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये इम्रानचा दमदार अॅक्शन अवतार पाहायला मिळत असून, त्याच्या या नव्या भूमिकेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. इम्रान हाश्मीच्या चित्रपटांमधील गाण्यांना नेहमीच विशेष महत्त्व असते. त्याची झलक यावेळीही ‘गनमास्टर जी९’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. दमदार अॅक्शन सीन्ससोबतच चित्रपटात एक भावनिक प्रेमकथाही उलगडणार असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते.
ट्रेलरमधील दमदार संवाद विशेष लक्ष वेधून घेत आहेत. प्रेमासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या व्यक्तीची भूमिका इम्रान साकारताना दिसत आहे. अभिनेत्री जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत असून, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक सिंग यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
विशेष म्हणजे, ट्रेलरमध्ये हिमेश रेशमिया आणि असीस कौर यांच्या आवाजातील ‘अफसाना बनाया आपने’ हे गाणे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. अॅक्शन आणि रोमान्सचा सुरेख मेळ या गाण्यामुळे पाहायला मिळतो.
एकूणच, अॅक्शन, रोमान्स, दमदार संवाद आणि सूडाची कथा अशा मनोरंजनाच्या सर्व घटकांनी ‘गनमास्टर जी९’चा ट्रेलर सजला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले असून, येत्या २७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे इम्रान हाश्मीचा हा नवा अॅक्शन अवतार मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.





