Rajgurunagar : अधिकार्यावरील हल्ल्यानंतर कर्मचारी संतप्त
Rajgurunagar :या घटनेच्या निषेधार्थ खेड तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी खेड तहसीलदार कार्यालयात एकत्र आले. संबंधित आरोपीवर तात्काळ अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील मरकळ ग्रामपंचायत कार्यालयात कर्तव्य बजावत असलेल्या ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब जाधव यांच्यावर प्रशांत देविदास लोखंडे याने कथितरित्या हल्ला करून मारहाण केल्याच्या घटनेने महसूल विभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित आरोपीवर तात्काळ अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, या मागणीसाठी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने खेड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आरोपीला अटक न झाल्यास महसुली कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
5 ऑक्टोबर रोजी मरकळ येथे बाळासाहेब जाधव हे नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तसेच इतर तातडीचे शासकीय कामकाज करीत असताना प्रशांत देविदास लोखंडे याने त्यांच्या कामात अडथळा आणून त्यांना मारहाण केल्याचे संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कथित हल्ल्यात जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. शासकीय कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला होणे ही गंभीर बाब असून, त्यामुळे महसूल कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ खेड तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी खेड तहसीलदार कार्यालयात एकत्र आले. संबंधित आरोपीवर तात्काळ अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. आरोपीला अटक न झाल्यास निवडणूकविषयक कामकाज, नैसर्गिक आपत्तीशी संबंधित तातडीची कामे आणि एसआयआरचे कामकाज वगळता इतर सर्व महसुली कामकाज बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
यावेळी मंडल अधिकारी चेतन चासकर, निलेश घोडके, गणेश रोकडे, माणिक गायकवाड, ए. के. सुतार, शीतल शेवाळे, शीला शेवाळे तसेच ग्राम महसूल अधिकारी अमित देवकर, दीपक कट्टे, दिलीप राठोड, वैशाली झेंडे, शरद दाते, रविंद्र केगले, गजानन सोटपल्लीवार, मनोज जाधव, अमोल नेहुल, अनिल जगताप, अनिकेत कड, अख्तर इनामदार, संजय वाघमारे, प्रमोद सानप, विशाल जांभळे, प्रदीप गीते, उज्ज्वल लाटे, निसर्ग येवले, प्रतिभा कसबे, अक्षदा चौधरी, संगीता लांडे, दीपाली कोठावळे, भाग्यश्री कोपर्डे, विजया पाटील यांच्यासह तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.
मरकळ येथे कर्तव्यावर असलेल्या ग्राम महसूल अधिकार्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पोलिसांकडे तक्रार देऊनही हल्ल्याप्रकरणी उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ला करणार्या व्यक्तीला तात्काळ अटक करावी. नैसर्गिक आपत्ती आणि एसआयआरचे कामकाज सुरू राहील; मात्र आरोपीला अटक होईपर्यंत इतर महसुली कामकाज बंद ठेवण्यात येईल.
-अमित देवकर, ग्राम महसूल अधिकारी प्रतिनिधी





