आता ९ ऐवजी १० तास ऑफिसमध्ये काम करावं लागणार ; ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

Employee Working Hours। आंध्र प्रदेश सरकारने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार कायद्यांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांनुसार, आता कर्मचाऱ्यांना दिवसाला १० तास काम करावे लागेल, जे पूर्वी ९ तास होते. हा नवीन नियम ‘आंध्र प्रदेश कारखाना कायदा’ अंतर्गत लागू करण्यात आला आहे. तसेच नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आहे.
पूर्वी कर्मचाऱ्यांसाठी कमाल कामाची मर्यादा ८ तास होती, जी सुमारे दहा वर्षांपूर्वी ९ तासांपर्यंत वाढवण्यात आली होती. आता कलम ५४ अंतर्गत ती आणखी १० तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासोबतच, कलम ५५ मध्येही सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी पाच तास काम केल्यानंतर अर्धा तास ब्रेक अनिवार्य होता, जो आता सहा तास काम केल्यानंतर एक तासाचा ब्रेक करण्यात आला आहे.
ओव्हरटाइमच्या कमाल मर्यादेतही बदल Employee Working Hours।
याव्यतिरिक्त, ओव्हरटाइमची कमाल मर्यादा देखील बदलण्यात आली आहे. पूर्वी ती ७५ तास होती, जी आता १४४ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्याचे माहिती आणि जनसंपर्क मंत्री के. पार्थसारधी म्हणाले की, हे बदल सरकारच्या “व्यवसाय सुलभीकरण” धोरणाचा भाग आहेत. ते म्हणतात की नियम थोडे शिथिल केल्याने आंध्र प्रदेशात अधिक गुंतवणूक येईल आणि व्यवसाय करणे सोपे होईल.
कामगार संघटनांनी या निर्णयाला केला विरोध Employee Working Hours।
दुसरीकडे, कामगार संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की नवीन नियमांमुळे कारखाना मालक कामगारांना निर्धारित वेळेपेक्षा जास्त, म्हणजेच दोन तास जास्त काम करायला लावू शकतात. यामुळे कर्मचाऱ्यांना दररोज १२ तास किंवा त्याहून अधिक काम करावे लागू शकते, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर आणि वैयक्तिक जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो.





