नैसर्गिक शेतीतून विषमुक्त अन्नावर भर

पुणे – राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत राज्यात 2,550 नैसर्गिक शेती समूह स्थापन करण्यात येणार असून राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वेच्छेने नैसर्गिक, विषमुक्त शेतीकडे वळण्याचे प्रयत्न शासन स्तरावरून सुरू आहेत.
“राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेच्या प्रचार प्रसिद्धी व जनजागृतीसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) येथे राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती,’ असे कृषी आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले. यावेळी केंद्र शासनाच्या “आयएनएम’ विभागाच्या सल्लागार डॉ. वंदना द्विवेदी, राष्ट्रीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती केंद्राचे संचालक डॉ. गगनेश शर्मा, विभागीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती केंद्राचे विभागीय संचालक अजय सिंग राजपूत, “आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे, हरिधारा कृषी समितीचे संस्थापक मारुती माने उपस्थित होते.
एका ग्रामपंचायतीतील 50 हेक्टर क्षेत्राचा एक समूह करायचा असून या समूहातील शेतकऱ्यांना शेती शाळेमार्फत प्रशिक्षण, क्षेत्रीय भेटी आयोजित करण्यात याव्यात, असे डॉ. द्विवेदी म्हणाल्या.
नैसर्गिक शेती म्हणजे काय?
नैसर्गिक शेतीमध्ये जमिनीचे नैसर्गिक स्वरूप राखले जाते. यामध्ये निसर्गात सहज सापडणारे जीवाणू आणि घटक वापरून शेती केली जाते. तसेच पर्यावरणाची हानी होत नाही. यासोबतच नैसर्गिक शेतीत शेतकऱ्यांचा खर्चही कमी होतो. यामध्ये केवळ नैसर्गिक खत, झाडे आणि वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले खत, शेणखत आणि सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर केला जातो.
नैसर्गिक शेती कुठून सुरू झाली?
जपानी शेतकरी आणि तत्त्वज्ञ मासानोबू फुकुओका यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी नैसर्गिक शेती सुरू केली. फुकुओका यांनी जपानी भाषेत लिहिलेल्या त्यांच्या “सिजेन नोहो’ या पुस्तकात या पद्धतीची संपूर्ण माहिती दिली आहे. म्हणूनच या कृषी पद्धतीला जगभरात “फुकुओका पद्धत’ असेही म्हणतात. या पद्धतीत “काहीही करू नका’ असा सल्ला दिला जातो. यामध्ये शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे नांगरणी, तण किंवा खते किंवा कीटकनाशके वापरू नयेत, असे सांगण्यात आले आहे.
नैसर्गिक शेतीचे फायदे काय?
नैसर्गिक शेतीच्या पहिल्या वर्षी उत्पादनात कोणतीही घट येत नाही. त्याचबरोबर रसायने आणि खतांवर होणारा हजारो रुपयांचा खर्चही वाचतो. एवढेच नव्हे, तर रसायनमुक्त असल्याने नैसर्गिक शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला बाजारात लवकर आणि चढ्या भावाने विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते. पिकांवर रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होत असल्याचे दिसून येते.
पृथ्वी वाचवणारी कृषी पद्धत
मातीची उत्पादन क्षमता वाढवणे तसेच पर्यावरण सुधारणे, हरितगृह वायूचे उत्सर्जन संपवणे किंवा कमी करणे यासारखे फायदे घेण्यासाठी रसायनमुक्त शेती म्हणजेच नैसर्गिक शेती सुरू करण्यात आली आहे. जगभरात, नैसर्गिक शेती ही पृथ्वी वाचवणारी कृषी पद्धत मानली जात आहे.
या राज्यांमध्ये केली जाते नैसर्गिक शेती
भारतात या कृषी पद्धतीचा अवलंब करणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, छत्तीसगड, केरळ, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि आता उत्तरप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. सोबतच महाराष्ट्राने त्यासाठी पावले उचलली आहेत.





