पिंपरी | प्रशासकीय सक्षमतेवर महापालिकेचा भर

पिंपरी, (प्रतिनधी) – नागरिकांना सोयी सुविधा देण्याकरिता माहापालिका प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या जीआयएस प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या विविध विभागांसाठी ३५ आयटी सॉफ्टवेअर्स एकात्मिक पद्धतीने विकसित करण्यात येत आहेत. याबाबत ८० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांना या प्रणाली कार्यान्वीत करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त संदीप खोत, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, कार्यकारी अभियंता हरदिपसिंग बन्सल आदी उपस्थित होते. प्रकल्प सल्लागार राजा डॉन, सुदीप मिटकरी, एटोसचे अविनाश पाटील, अमित उपाध्याय, धिरज पाटील, साजन सानप, निलेश शिरलकर यांनी सोप्या भाषेत संगणक प्रणालीची माहिती दिली. तसेच, कर्मचा-यांना उदभवणा-या अडचणींवर चर्चा करण्यात आली.
प्रशासनाला शहराचे चांगल्या प्रकारे नियोजन करणे, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यक्षमता वाढणे, कामाचा वेळ कमी होणे, त्रुटी कमी होणे यासाठी जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) आणि ईआरपी (एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग) सारख्या प्रणालीचा प्रशासकीय कामकाजात समावेश करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना जलद आणि कार्यक्षम सेवा, सुधारित पायाभूत सुविधा, अधिक पारदर्शक प्रशासन यासारखे अनेक फायदे मिळणार आहे.
प्रशासकीय कार्यक्षमता वाढणार
जीआयएस प्रणालीद्वारे शहरातील सर्व भौगोलिक माहिती (रस्ते, इमारती, नकाशे इत्यादी) एका ठिकाणी संग्रहित करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबर, ईआरपी प्रणालीद्वारे महापालिकेच्या सर्व विभागांना एकात्रित करण्यात येत असून, त्यांचे काम अधिक कार्यक्षम बनविण्यात येत आहे.
ईआरपी, जीआयएस आणि डिजिटल वर्कफ्लो मॅनेजमेंट या तीनही प्रणाली एकमेकांशी जोडल्या जात आहेत. यामुळे महापालिकेचा जीआयएस डेटाबेस सतत आणि रिअल टाइम आधारावर अपडेट होईल. नागरिकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे सेवा प्रदान करणे, पालिका कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी दिली.





