हिना खानने शेअर केली भावूक पोस्ट; म्हणाली ‘आता ही एक पापणी…’

Hina Khan | अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी झुंज देत आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या उपचारादरम्यान तिला बऱ्याच गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र ती प्रत्येक अडचणीचा मोठ्या हिमतीने सामना करत आहे. हिना चाहत्यांना तिच्या उपचारांबाबत माहिती देत असते. नुकतेच तिने पापण्यांचा एक फोटो शेअर केला आहे.
केमोथेरपी सुरू असताना हिनाने टक्कल केलं होतं. यानंतर हळूहळू तिच्या भुवयांचेही केस गळू लागले. आता नुकत्याच एका पोस्टमध्ये हिनानेतिच्या पापण्यांचेही केस गळू लागले असल्याचे सांगितले. हिना खानने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. हा फोटो तिच्या डोळ्याचा असून, यात एकच पापणी दिसत आहे.
View this post on Instagram
हिनाने पोस्ट शेअर करताना लिहिले, “या पापण्या माझ्या डोळ्यांची सुंदरता वाढवायच्या. माझ्या पापण्या या आनुवंशिकतेने लांब आणि सुंदर होत्या. आता ही पापणी माझ्या बाजूने लढत एकटी उभी आहे. माझ्या शेवटच्या केमोथेरपीदरम्यान ही एक पापणी माझा प्रेरणास्रोत आहे. मी कृत्रिम किंवा खोट्या गोष्टी परिधान केल्या नाहीत. आता मात्र मी माझ्या शूटिंगसाठी त्या वापरते. काही नाही, सगळं ठीक होईल”, असे म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिला धीर दिला आहे.
दरम्यान, २८ जूनला हीना खानने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर तिला कर्करोगाचे निदान झाल्याचे एक पोस्ट शेअर करीत सांगितले होते. मात्र या आजाराशी झुंज देतानाही ती आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करताना दिसली. तिचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेद्वारे घराघरां पोहोचली आहे. ‘बिग बॉस’च्या 11 व्या सीझनमध्ये ती टॉप २ मध्ये पोहोचली होती. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये देखील ती सहभागी झाली होती.





