कर्नाटकच्या मुख्यमंत्री निवडीवरून कॉंग्रेस श्रेष्ठींपुढे ‘पेच”

बंगळुरू – कर्नाटकच्या मुख्यमंत्री निवडीवरून कॉंग्रेस श्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे. अशात त्या पदाचे दावेदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी सोमवारी अचानकपणे दिल्लीवारी रद्द केली. त्यामुळे सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आणि कर्नाटकविषयीच्या सस्पेन्समध्ये आणखीच भर पडली. आता मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेली कोंडी कॉंग्रेस श्रेष्ठी कशी फोडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून कॉंग्रेसने कर्नाटकची सत्ता काबीज केली. मात्र, मुख्यमंत्री निवडीचे मोठे आव्हान त्या पक्षापुढे उभे राहणार असल्याचे निकालानंतर सूचित झाले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्रिपदासाठी असणारे दोन प्रबळ दावेदार. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दावेदारांपैकी कुणाची निवड करायची अशा पेचात पक्षश्रेष्ठी सापडले आहेत.
त्यांनी कोंडी फोडण्यासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना दिल्लीला पाचारण केले. त्या आदेशानुसार सिद्धरामय्या देशाच्या राजधानीत दाखल झाले. मात्र, प्रकृतीचे कारण पुढे करून शिवकुमार यांनी दिल्ली भेट रद्द केली. ताप येण्याबरोबरच त्यांना पोटाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठीचा पॉवरप्ले दिल्लीत पोहचला आहे. त्यामुळे शिवकुमार यांच्या दिल्लीला न जाण्याच्या घडामोडीचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत. अर्थात, मुख्यमंत्रिपदाच्या पेचावर सामोपचाराने तोडगा काढण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस श्रेष्ठी सक्रिय झाले आहेत. त्यातून सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांचे समाधान होईल असा फॉर्म्युला निश्चित केले जाण्याचे संकेत मिळत आहेत.





