Elvish Yadav: एल्विश यादवच्या घरावर गोळीबार; ५० कोटींचा मालक असलेला यूट्यूबर पुन्हा चर्चेत

Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी २ चे विजेते आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुरुग्राममधील त्यांच्या घरावर तिघा बाइकस्वारांनी गोळीबार केला. तब्बल दोन डझनपेक्षा जास्त गोळ्या झाडण्यात आल्या. घराच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर गोळ्यांचे खुणा दिसून येतात. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली असून हल्ल्याची जबाबदारी “भाऊ गॅंग” ने स्वीकारली आहे. तसेच इतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही त्यांनी धमकी दिली आहे.
एल्विश यादवची संपत्ती
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार, एल्विश यादव आज तब्बल ५० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. गुरुग्राममध्ये त्यांचे भव्य घर असून त्यात तब्बल १६ बेडरूम आहेत. त्यांना महागड्या गाड्यांचा शौक असून ३ कोटी किंमतीची मर्सिडीज बेंझ-जी वैगन इलेक्ट्रिक त्यांच्याकडे आहे. सोशल मीडिया आणि यूट्यूबवरूनही ते मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात. नुकत्याच झालेल्या ‘लाफ्टर शेफ्स २’ या रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी एका भागासाठी २ लाख रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते.
रिअॅलिटी शोमध्ये चमक
एल्विश यादवने यूट्यूबवरून करिअरची सुरुवात केली आणि आज ते मोठे स्टार झाले आहेत. त्यांनी बिग बॉस ओटीटी २, रोडीज २० (टीम लीडर) आणि लाफ्टर शेफ्स २ असे तीन रिअॅलिटी शो जिंकले आहेत. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड स्पर्धकाने ट्रॉफी जिंकली होती आणि तो विक्रम एल्विशने केला.
वादांशी नातं
एल्विश यांचे नाव याआधीही अनेकदा वादांमध्ये आले आहे. त्यांच्यावर सापाच्या विषाची तस्करी व रेव्ह पार्टीमध्ये त्याचा वापर केल्याचा आरोप लागला होता. या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशीही केली होती. आता पुन्हा घरावर झालेल्या गोळीबारामुळे ते चर्चेत आले आहेत.





