मुंबई – अमेरिकेतील टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपनीचे संस्थापक ईलॉन मस्क यांनी इलेक्ट्रिक कार आणि भारतातील मोबाईल क्षेत्रात प्रवेशासाठी गेल्या पाच वर्षात बरीच धडपड केली होती. मात्र त्यांना यश आले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अमेरिका भेटीवेळी ईलॉन मस्क यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता मस्क यांचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क काही प्रमाणात कमी करण्यात आल्यानंतर मस्क यांनी मुंबई आणि दिल्लीत टेस्लाच्या शोरूम सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. असे असतानाच मंगळवारी भारतातील मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी एअरटेलने मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनी बरोबर सॅटेलाईटच्या माध्यमातून दुर्गम भागात मोबाईल सेवा पुरविण्यासाठी सहकार्य करार केला असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेच बुधवारी स्पेस एक्सने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ बरोबर याच कारणासाठी सहकार्य करार केला असल्याची घोषणा केली. रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपन्यांनी स्पेस एक्सला भारतात येण्यापासून रोखण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. उपग्रह स्पेक्ट्रम निविदाच्या माध्यमातूनच विकले जावे असा आग्रह या दोन कंपन्यांनी केला होता. मात्र भारत सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. आता या दोन कंपन्यांनी थेट स्पेस एक्स कंपनीबरोबर सहकार्य करार केला आहे. त्यामुळे आता स्पेस एक्स, रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या माध्यमातून भारतात सॅटेलाईट स्पेक्ट्रमच माध्यमातून दुर्गम भागात सेवा पुरविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मस्क यांचा अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावर बराच प्रभाव आहे . या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळविला असल्याचे दिसून येते.