बापमाणूस! इलॉन मस्क 14व्यांदा झाले बाबा, नवजात बाळाचे नाव ठेवले…

Elon Musk | अब्जाधीश इलॉन मस्क गेल्याकाही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून मस्क त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. आता मस्क यांनी त्यांच्या 14व्या बाळाचे स्वागत केले आहे. मस्क हे तब्बल 14व्यांदा बाबा झाले आहेत. मस्क यांच्या जोडीदार आणि न्यूरालिंकच्या अधिकारी असलेल्या शिवॉन झिलिस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली.
शिवॉन यांना याआधीच मस्क यांच्यापासून तीन मुलं आहेत. आता दोघांनी चौथ्या बाळाचे स्वागत केलं आहे. या जोडप्याने या बाळाचे नाव सेल्डन लाइकर्गस (Seldon Lycurgus) असे ठेवले आहे.
झिलिस यांनी बाळाची माहिती देताना सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, इलॉन आणि मी आमची मुलगी आर्केडियाच्या वाढदिवसानिमित्त आमच्या गोंडस शेल्डन लाइकर्गस बद्दल सर्वांना माहिती देण्याचा निर्णय घेतला.’ झिलिस यांच्या पोस्टवर मस्क यांनी देखील हार्ट इमोजीच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
♥️
— Elon Musk (@elonmusk) February 28, 2025
2021 मध्ये मस्क आणि झिलिस हे जुळ्या बाळांचे पालक बनल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर 2024 मध्ये झिलिस यांनी तिसऱ्या बाळाला जन्म दिला. आता सेल्डनला जन्म देत त्या चौथ्यांदा आई झाल्या आहेत.
दरम्यान, मस्क हे 2002 मध्ये पहिल्यांदा बाबा झाले होते. त्यांच्या पत्नी जस्टिन विल्सन यांनी नेवाडा अॅलेक्झँडरला जन्म दिला होता. त्यानंतर हे जोडपे IVFच्या मदतीने जुळी मुलं आणि 3 मुलांचे पालक झाले. मस्क आणि गायक ग्रिम्स यांनाही तीन मुलं आहेत.





