इलॉन मस्कसाठी नववर्षाची सुरुवातच खराब, तब्बल 17.7 अब्ज डॉलर संपत्ती घटली; ‘हे’ आहे कारण

Elon Musk Net Worth: अब्जाधीश इलॉन मस्क यांच्यासाठी नववर्षाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. वर्षाचा पहिलाच ट्रेडिंग दिवस असलेल्या गुरुवारी त्यांची संपत्ती तब्बल 17.7 अब्ज डॉलरने कमी झाली आहे.
टेस्लाच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांनी घट झाल्याने त्यांच्या संपत्तीचा आकडा 415 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. यावर्षी एवढी मोठी घट झालेले मस्क हे पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. टेस्ला कारच्या विक्रीत मोठी घट झाल्याने मस्क यांना फटका बसला आहे. 2023 मध्ये कंपनीने 18 लाख गाड्यांची विक्री केली होती. मात्र, 2024 मध्ये कंपनीला 17.9 लाख विक्रीचाच आकडा गाठता आला आहे.
मस्क यांची 17 डिसेंबर 2024 ला संपत्ती 486 अब्ज डॉलर एवढी होती. मागील 15 दिवसात त्यांच्या संपत्तीत 71 अब्ज डॉलरपेक्षा अधिकची घट झाली आहे. मात्र, मागील वर्षभरात त्यांच्या संपत्तीचा आकडा 220 अब्ज डॉलरवरून 415 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
मस्क यांची वर्षाची सुरुवात खराब झाली असली तरीही मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यासाठी मात्र नववर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. झुकरबर्ग यांची संपत्ती एका दिवसात 4.70 अब्ज डॉलरने वाढली आहे. 212 अब्ज डॉलर संपत्तीसह ते सध्या जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.





