जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट ‘स्टारशिप’चे शनिवारी होणार प्रक्षेपण

टेक्सास – स्पेस एक्सचे मालक एलॉन मस्क भारतीय वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी 06.30 वाजता जगातील सर्वात शक्तिशाली स्टारशिप वाहनाची दुसरी चाचणी घेणार आहेत. यापूर्वी हे प्रक्षेपण 17 नोव्हेंबरला होणार होते. ग्रीड फिनमध्ये बिघाड झाल्यामुळे उद्यावर ढकलण्यात आले आहे.
“ग्रिड फिन ऍक्ट्युएटर बदलावा लागेल, त्यामुळे प्रक्षेपण शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे,’ अशी माहिती यावेळी बोलताना मस्क यांनी दिली आहे. ग्रिड फिन बूस्टरला पृथ्वीवर परत येण्यास मदत करतात. स्टारशिप स्पेसक्राफ्ट आणि सुपर हेवी रॉकेट यांना एकत्रितपणे “स्टारशिप’ असे नाव देण्यात आले आहे.
योजनेनुसार प्रक्षेपणानुसार हे मिशन दीड तास चालेल. लाइव्ह स्ट्रिमिंग 30 मिनिटे आधी म्हणजेच संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होईल. स्टारशिप अंतराळात नेले जाईल, नंतर पृथ्वीवर परत आणले जाईल आणि पाण्यात उतरवले जाईल. ही एक पुन्हा वापरता येण्याजोगी वाहतूक व्यवस्था आहे. याद्वारे मानवाला मंगळवार पाठविण्याची योजना आहे.
यापूर्वी 20 एप्रिल रोजी स्टारशिपची पहिली चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत बूस्टर 7 आणि शिप 24 लॉंच करण्यात आले. तथापि, टेकऑफच्या अवघ्या 4 मिनिटांनंतर मेक्सिकोच्या आखातापासून 30 किलोमीटर वर स्टारशिपचा स्फोट झाला होता. स्टारशिपच्या अपयशानंतरही एलॉन मस्क आणि कर्मचारी स्पेसएक्सच्या मुख्यालयात आनंदोत्सव साजरा करताना दिसले होते.कारण लॉंचपॅडवरूनच रॉकेट उडवण्यात त्यांना मोठे यश मिळाले. स्टेनलेस स्टीलचे बनलेले “स्टारशिप’ हे जगातील सर्वात उंच आणि शक्तिशाली रॉकेट आहे.
लॉन्च पॅडला नुकसान नाही
गेल्यावेळी प्रक्षेपण अयशस्वी झाल्यानंतर, मस्क यांनी 29 एप्रिल रोजी ट्विटरवर म्हटले होते की, “प्रक्षेपण मोठ्या प्रमाणावर माझ्या अपेक्षेप्रमाणे होते आणि कदाचित माझ्या अपेक्षेपेक्षा थोडे अधिक होते. या घटनेत लॉन्च पॅडचे नुकसान इतके कमी आहे की काही महिन्यांत स्टारशिप पुन्हा उड्डाणासाठी तयार होऊ शकते.’ पहिल्या उड्डाणापासून शिकून, स्पेस एक्सने दुसऱ्या उड्डाणासाठी वाहन आणि ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड केले. यावेळी कंपनी हॉट-स्टेज सेपरेशन सिस्टम आणि नवीन इलेक्ट्रॉनिक थ्रस्ट वेक्टर कंट्रोल (टीव्हीसी) सिस्टम वापरेल. पॅड फाउंडेशन आणि वॉटर-कूल्ड स्टील फ्लेम डिफ्लेक्टर मजबूत करण्याव्यतिरिक्त, इतर अनेक अपग्रेड देखील केले गेले आहेत.
जगातील सर्वात शक्तिशाली वाहन
स्टारशिप हे आतापर्यंत विकसित केलेले जगातील सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण वाहन आहे. हे पूर्णपणे पुन्हा वापरण्यायोग्य आणि 150 मेट्रिक टन भार वाहून नेण्यास सक्षम आहे. स्टारशिप सिस्टीम एकाच वेळी 100 लोकांना मंगळावर घेऊन जाईल. हे स्पेसशिप माणसांना एका तासापेक्षा कमी वेळेत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवण्यास सक्षम असेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास मानव पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहावर प्रथमच पाऊल ठेवणार आहे. 2029 पर्यंत मंगळावर मानव पाठवून तेथे वसाहत स्थापन कराण्याची मस्क यांची योजना आहे.
स्टारशिप सिस्टम
-उंची: 397 फूट
-व्यास: 9 मीटर
-पेलोड क्षमता: 100-150 एमटी
स्टारशिप काय करू शकते?
-पेलोड वितरण
-चंद्र मोहिमा
-पृथ्वी ते पृथ्वी वाहतूक
-आंतरग्रहीय वाहतूक
-मानवाला मंगळावर पाठवणे





