वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करा; संदीप सातव यांची मनपा प्रशासनाकडे मागणी

वाघोली – वाघोली आव्हाळवाडी रस्त्यालगत असणाऱ्या फळ विक्रेते व मजूर अड्डा मधील कामगारांना बाजार तळ्याच्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी महाराष्ट्र शासन पुणे महानगरपालिका गाव सुधारणा समिती सदस्य संदीप सातव यांनी वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतीत सातव यांनी सांगितले की, वाघोली आव्हाळवाडी रोडवर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. पुढे अनेक गावांना जोडणारा हा रस्ता आहे. फळ व भाजीपाला विक्रेते बसत असतात. तसेच सकाळी आव्हाळवाडी फाटा येथे मजूर अड्डा असून या ठिकाणी शेकडोच्या संख्येने मजुर जमा होत असतात. यामुळे आव्हाळवाडी रोड वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहे. महिलांना जीव मुठीत धरून जावे लागते. विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत जाताना अनेक नागरिकांना कामावर जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वास्तविक पाहता बाजारतळ कंपाऊंड वॉल आतमध्ये मोठ्या प्रमाणात जागा असून फळ व भाजीपाला विक्रेते यांनी कंपाऊंड वॉल आत बसणे गरजेचे आहे. मजूर अड्डा कंपाऊंड वॉल आतमध्ये स्थलांतरित करणे शक्य आहे. परंतु आपल्या स्तरावर उपाययोजना केल्या जात नाही. सदर फळ व भाजीपाला विक्रेते तसेच मजूर अड्डा तत्काळ बाजार तळ कंपाऊंड वॉलच्या आत स्थलांतरित करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संदीप सातव यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.





