अकरावी प्रवेश पुन्हा एकदा मुदतवाढ

पुणे – राज्यात इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाबाबत अद्याप पुरेशी जनजागृती झालेली नाही. विद्यार्थी, पालकांसाठी प्रवेशाबाबतची माहिती देण्यासाठी आवश्यक तेवढे मार्गदर्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकात दुसऱ्यांदा बदल करून मुदत वाढविण्यात आलेली आहे. त्याबाबतचे सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना रविवारपासून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तसेच ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी 1 ऑगस्टपासून सुविधा उपलब्ध होणार आहे.

पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रात अकरावीसाठी ऑनलाइन पद्धत राबविण्यात येत आहे. आधी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक 1 जुलै रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा 14 जुलै रोजी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
कनिष्ठ महाविद्यालये, मार्गदर्शन केंद्र व माध्यमिक शाळांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहेत. विद्यार्थी, पालकांना प्रवेशाची सविस्तर माहिती देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. यासाठी त्यांना मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करावे, असे
आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सचांलक दिनकर पाटील यांनी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालकांना बजावले आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अकरावी प्रवेशासाठी 305 पैकी 299 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. या महाविद्यालयात प्रवेशाच्या 1 लाख 4 हजार 12 जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. प्रवेश अर्ज भरण्याचा ऑनलाईन सराव करण्याचा लाभ 32 हजार 811 विद्यार्थ्यांनी घेतला आहे.





