Pimpri : मावळच्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव

कामशेत : तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असतानाच ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. विशेषतः नाणे मावळ परिसरातील अनेक गावांत वीजपुरवठा तासन्तास खंडित राहतो, परिणामी नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागते. महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे केली गेली नाहीत, याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले आहे.
ग्रामीण भाग जंगलांनी वेढलेला असल्याने रात्रीच्या अंधारात जंगली प्राण्यांचा वावर अधिक धोकादायक ठरतो. त्यातच लाइट नसल्याने पाणीपुरवठा, शेती पंप, दैनंदिन घरगुती वापर आणि लहान व्यावसायिक कामे ठप्प होतात. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विद्युत उपकरणेही खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महावितरणकडून वेळेवर कोणतीच कार्यवाही होत नाही, तक्रारी केल्यानंतरही कर्मचारी वेळेत येत नाहीत, आणि नागरिकांनी विचारणा केली तर अरेरावीची वागणूक दिली जाते. महावितरण अधिकारी ‘‘आमच्याकडे तक्रार आलेली नाही असे सांगून नागरिकांना काय करायचे ते करा’’ तर वायरमन ‘‘आम्ही आमच्या वेळेनुसार येतो, कायदा शिकवू नका.’’ अशी उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
राजकीय व स्थानिक यंत्रणांचेही दुर्लक्ष
नाणे मावळातील नागरिकांच्या मते, ग्रामपंचायत व स्थानिक राजकीय नेतृत्वानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महावितरण मनमानी कारभार करतो आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. वीज बिल थकवल्यास तत्काळ कनेक्शन कट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाइट गेल्यानंतर मात्र अनेक तास दाद देत नाहीत, ही नागरिकांची तक्रार आहे.
महावितरणची भूमिका
आम्ही कुठे लाइट गेली तर आम्ही ते लवकर काम करतो.पण ते काम करत असताना नागरिक आम्हाला गलिच्छ भाषेत अरेरावी करत असतात. आम्ही कोणालाही नियमाबाह्य बोलत नाही.
– संदीप रेखडगेवार, कामशेत महावितरण अधिकारी
या संदर्भात कामशेत महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आमच्याकडे ऑनलाइन तक्रारी आली नाही.आली की ८ तासांमध्ये तुमचे काम करून देऊ, तुम्ही आम्हाला आमच्या कामाची पद्धत शिकवू नका तुम्हाला काय करायचे ते करा अशा प्रकारची भाषा करत आहे.
– रमेश आंद्रे, नागरिक
महावितरणाच्या अधिकाऱ्यांना लाइट बिलसंदर्भात विचारणा करण्यासाठी गेलो असता, तुम्ही वडगावला जाऊन विचारा असे सांगितले. त्यानंतर तक्रार बुक आहे का असे विचारले असता तक्रार बुक नाही तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा अशा पद्धतीचे उत्तर भाषा हे अधिकारी करत आहेत.
– मोहन वाघमारे, नागरिक





