पौड : कोळवण खोर्यातील अठरा गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबामुळे वीजपुरवठ्याचा सतत लपंडाव सुरू होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मावळ तालुक्यातील पवना-तुंगी फिडरमधून कोळवण खोर्यातील गावांना वीजपुरवठा करण्याच्या कामास अखेर सुरुवात झाली असून, त्यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोळवण खोर्यातील गावांमध्ये वीज कमी दाबाने येत असल्याने शेती, घरगुती वापर तसेच दैनंदिन जीवनावर परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर मुळशी तालुक्याचे माजी सभापती रवींद्र कंधारे व तुकाराम टेमघरे यांनी महावितरणच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांकडून सप्टेंबर 2023 मध्ये सर्वेक्षण करून तांत्रिक अंदाजपत्रक तयार करून घेतले होते. या कामासाठी निधी मंजूर व्हावा यासाठी आमदार शंकर मांडेकर यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आमदार मांडेकर यांनी या कामासाठी 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, या वीजपुरवठा कामाचा शनिवारी (दि. 27) श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कोळवण खोर्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवना-तुंगी फिडरमधून वीजपुरवठा सुरू झाल्याने कोळवण खोर्यातील वीज समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. जुने विद्युत लोखंडी खांब टप्प्याटप्प्याने बदलणार कोळवण खोर्यातील काशिग, हाडशी, वाळेण, साठेसाई, कोळवण, भालगुडी, डोंगरगाव, होतले, नांदगाव, चिखलगाव, नाणेगाव, कुळे, दखणे, चाले, सावरगाव, करमोळी आदी परिसरातील विद्युत खांब सुमारे 50 वर्षे जुने व गंजलेले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे खांब टप्प्याटप्प्याने बदलण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात येणार आहे. कोळवण खोर्यातील वीज समस्या पवना-तुंगी फिडरमधून वीजपुरवठा सुरू झाल्याने सुटणार आहे. या भागातील रस्त्यांची कामे दर्जेदार झाली आहेत. जलजीवन मिशनच्या कामांबाबत कोणत्याही गावात तक्रारी असतील तर संबंधित ग्रामपंचायतींनी त्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे कळवाव्यात. -शंकर मांडेकर, आमदार भोर विधानसभा मतदारसंघ