Electric Vehicles – शहराची वाढती वाहनसंख्या पाहता महापालिकेच्या वापरातील वाहनांबाबत ई वाहन वापरण्याचे धोरण राबवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष विशाल काळभोर यांनी केली आहे. या संदर्भात काळभोर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपले शहर देशांमध्ये जलद वाढणारे शहर असून आज शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या आसपास आहे. त्याच प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढून सुमारे २५ लाख असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे शहराची हवेची गुणवत्ता १३५ ते १५० झाली असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशित प्रमाणापेक्षा १० पट जास्त असल्याने शहरात हवेचे प्रदूषण अधिक झाल्याने नागरिकांना श्वसन विकाराचा त्रास होत आहे. तरी शहरातील धूर, धूळ, बेसुमार इंधन वापर , रसायन मिश्रित धूर यावर नियंत्रण राखणे आवश्यक असल्याने महापालिकेने त्याच्या वापरातील सर्व वाहने ‘ इ ‘ वाहनांचा वापर करण्याचे धोरण ठरवावे, अशी मागणी विशाल काळभोर यांनी केली आहे.