कोपरगाव – गेल्या पन्नास वर्षांपासून दोन कुटुंबांच्या हातात गुरफटून पडलेल्या सत्तेला बाहेर काढण्यासाठी तालुक्यातील जनतेनेच आता पक्का निर्धार केला असून, अपक्ष लढण्याची वेळ आली तरी आता मागे हटणार नाही, असा निश्चय जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे पाटील यांनी कोपरगाव येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलून दाखविला.
कोपरगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळेत सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्रबापू जाधव अध्यक्षस्थानी होते.
परजणे म्हणाले, कोपरगाव तालुक्यातील जनतेने पन्नास वर्षांपासून दोन परिवारांच्या हातात सत्ता दिली. परंतु जनतेचा सतत भ्रमनिरास झालेला आहे. तालुक्याचे हक्काचे पाणी या प्रस्थापितांना सांभाळता आले नाही. माजी केंद्रीय मंत्री स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांना सोबत घेऊन पाण्याच्या संकटाबाबत सखोल अभ्यास करुन पश्चिम घाटमाथ्यावर पडणारे पावसाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. परंतु या प्रस्तावावर फारसा गांभीर्याने विचार केला नाही. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्व. विखे यांनी या प्रस्तावावर चर्चा केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर विचार करण्याचे ठरविले आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. जनतेने तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तर शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासनही परजणे यांनी दिले.
परजणे म्हणाले, स्व. नामदेवराव परजणे यांनी केवळ तालुक्याचे गेलेले वैभव पुन्हा परत आणण्यासाठी निवडणूक लढवली. परंतु दुर्दैवाने त्यांना पराभव पत्करावा लागला. आता त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहेच. आतापर्यंत तालुक्यात तिसरा पर्याय नव्हता. म्हणून दोन कुटुंबांच्याभोवती सत्ता फिरत होती. परंतु जनताही आता दुधखळी राहिलेली नाही. प्रस्थापितांना ते त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वासही परजणे यांनी व्यक्त केला. राजेंद्र जाधव, अंबादास वराडे, एकनाथ संवत्सरकर, वसंतराव दहे यांचीही भाषणे झाली. यावेळी तालुक्यातून व शहरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता. गोदावरी खोरे दूध संघाचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव गुडघे यांनी आभार व्यक्त केले.