नेवासा विधानसभा मतदारसंघातील 1601 कर्मचाऱ्यांना देण्यात आले निवडणूक प्रशिक्षण

नेवासा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नेवासा मतदारसंघातील 1601 अधिकारी - कर्मचाऱ्यांना दोन सत्रात निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले. रामलिला लॉन्स येथे झालेल्या प्रशिक्षणासाठी प्रथम सत्रात 742 व द्वितीय सत्रात 859 अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रथम व द्वितीय सत्राला निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार संजय बिरादार,गटविकास अधिकारी संजय लखवाल उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी उंडे म्हणाले, मतदानाच्या आदल्या दिवशी नियमानुसार मतदान केंद्र तयार करून घ्यावे. मतदान केंद्रावर फक्त मतदान केंद्र प्रमुख व क्षेत्रीय अधिकारी या व्यतिरिक्त कुणालाही मोबाईल वापरण्यास परवानगी नाही, असे त्यांनी सांगितले.निवडणूक अनुषंगाने कायदेशीर तरतुदीसाठी महत्त्वाचे अधिनियम विधानसभा निवडणूक २०२४ मधील महत्त्वाचे बदल, मतदान दरम्यान भरावयाचे विविध नमुन्यांचे विवरण याचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.
निवडणूक विषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देशही उंडे यांनी दिले.
ज्ञानोदय इंग्लिश स्कूल येथे मतदान यंत्र हाताळण्याबाबत सविस्तर प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मतदान अधिकारी यांनी मतदान यंत्र स्वतः हाताळले व त्याबाबतची माहिती घेतली. मतदान यंत्राचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, आयटीआयचे कर्मचारी, मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.





