पिंपरी, – चिंचवड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीची प्रक्रिया शांत, सौहार्दपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी नागरिकांनी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे. चिंचवड विधानसभा निवडणूकीची मतमोजणी शनिवारी (दि. २३) सकाळी ८ पासून थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवनात पार पडणार आहे. मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षाचे सील शनिवारी सकाळी ६ वाजता उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. मतमोजणीसाठी एकूण २९ टेबल लावण्यात आले असून २४ फेऱ्या होणार आहेत. ईव्हीएम, टपाली आणि ईटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) अनुक्रमे २४, ४, १ टेबल लावले आहेत. मतमोजणी प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिलेल्या ओळखपत्राद्वारे मतमोजणी परिसरात प्रवेश दिला जाईल. उमेदवारांना मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देताना त्यांची दोन स्तरावर तपासणी केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बाळगण्यास मनाई आहे. उमेदवारांनी आपल्या प्रतिनिधींना तशा सूचना द्याव्यात. उमेदवारांसह प्रतिनिधींना ओळखपत्र बंधनकारक मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. मतदान प्रतिनिधी एकदा मतमोजणी कक्षातून बाहेर गेल्यानंतर त्यास पुन्हा मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणीच्या ठिकाणी वागणूक वर्तणूकीच्या बाबतीत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. शिस्तबद्ध वातावरणामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराने किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने किंवा मतमोजणी प्रतिनिधीने मतमोजणी परिसरामध्ये शिस्तीचा भंग केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे. तसेच, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवनासमोरील मुख्य रस्ता बंद राहणार आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना सहकार्याचे करण्याचे आवाहन मतमोजणी परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. १५० मीटरमध्ये इतरांना प्रवेश प्रतिबंधीत राहील. सुरक्षेच्या दृष्टीने संपुर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये योग्य ती खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.