Election Results 2026: देशाच्या 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचाही आज निकाल ; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात
Election Results 2026: देशाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे.

Election Results 2026: देशाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्तापालटाची लाट अशा विविध मुद्द्यांवर लढल्या गेलेल्या या निवडणुकीसाठीच्या मतमोतणीला, आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.
ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, हिमंता बिस्वा सरमांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला आजच्या निकालांवर अवलंबून आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सर्वस्व पणाला लावलंय. तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे भाजपची सत्ता यावी यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले होते.
ममता आणि मोदींसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या बंगालमध्ये, यंदा, मतदानाच्या टक्केवारीने जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 92 टक्क्यांपर्यंत मजल मारलीय..त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या विजयाचा चौकार की पहिल्यांदाच भाजप सरकार याकडे लक्ष लागलं आहे.
पश्चिम बंगालच्या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालावर देशाचं लक्ष लागलं आहे. सलग तीन वेळा सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींचीच्या हाती पुन्हा सत्ता येणार की सत्तापालट होणार याकडे लक्ष लागलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ असा सट्टेबाजाराचा कल हाती आलाय. तामिळनाडूत द्रमुक, आसाममध्ये भाजपला सट्टेबाजाराचा कौल आला असून मुंबईचा सट्टाबाजारही एक्झिट पोलसारखाच कौल देत आहे.
बंगालमध्ये बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा
बंगालमध्ये यंदा एकूण दोन टप्प्यात मतदान पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास राहिली आहे. बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा असून बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. यंदा भवानीपूरमधून ममता बॅनर्जी, नंदीग्राम आणि फाल्टा (अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ) या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तसेच सुवेंदु अधिकारी यांच्या प्रभावाखालील मेदिनीपूर पट्ट्यातील जागाही महत्त्वाच्या आहेत.
बारामती पोटनिवडणुकीचा आज निकाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागली होती. 23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 उमेदवार रिंगणात होते. मात्र एक्झिट पोलनुसार बारामतीत सुनेत्रा पवार दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होण्याची शक्यता आहे.
राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल
भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक लागली होती. 23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचाही आजच निकाल लागणार आहे..राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना ठाकरे पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळकेंसह इतर तीन अपक्ष असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान राहुरीतील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिलेंना जवळपास दीड लाख मतं पडण्याचा अंदाज आहे.






