पुणे जिल्हा | श्रीनिवास कदम यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

भवानीनगर, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील हिंगणेवाडी येथील श्रीनिवास कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने याच धरतीवर इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जाऊन मोर्चे बांधणी केली जात आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सक्रिय झाला असून संपूर्ण तालुका खासदार सुप्रिया सुळे यांनी पिंजून काढला असून प्रत्येक गावामध्ये पक्षाचे कार्यकर्ते तयार केले आहेत. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांची अनेक पदांवर नियुक्ती देखील केली आहे.
याचा एक भाग म्हणून इंदापूर तालुक्यातील सणसर हिंगणेवाडी येथील सणसर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्रीनिवास कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, अशोक घोगरे, अमोल भिसे, सागर मिसाळ अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीनिवास कदम म्हणाले की जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षाचे काम मोठ्या प्रमाणात उभा करून योग्य प्रकारे या पक्षाची ध्येय धोरणे समाजामध्ये सांगून या पक्षाचे काम इंदापूर तालुक्यांमध्ये चांगल्या प्रकारे केले जाईल.





