आप संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (आप) राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांची आप संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे निष्ठावान सहकारी मानले जाणाऱ्या सिंह यांचे पक्षातील वजन आणखी वाढले आहे.
सिंह दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य बनले आहेत. खासदारकीच्या पहिल्या कार्यकाळात ते आपचे राज्यसभेतील नेते होते. आता आणखी महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी आपचे आणि केजरीवाल यांचे आभार मानले. केजरीवाल यांनी नेहमीच रस्त्यापासून ते संसदेपर्यंत आवाज बुलंद करण्याची संधी मला दिली.
माझ्यावर सोपवण्यात आलेली नवी जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने सांभाळेन, अशी भावना सिंह यांनी सोशल मीडियावरून व्यक्त केली. आपचे राज्यसभेत 10, तर लोकसभेत 3 खासदार आहेत.संख्याबळाच्या दृष्टीने आप राज्यसभेतील चौथ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा घटक असणाऱ्या आपची दिल्ली आणि पंजाब या 2 राज्यांत सत्ता आहे.





