Election Commission SIR: दोन आयुक्तांचा आक्षेप अन् आयोगाचा यू-टर्न ; फॉर्म ६ मधून SIR हटवले
Election Commission SIR: नवमतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदवण्याच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे.

Election Commission SIR: नवमतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदवण्याच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. आयोगाने ऑनलाइन फॉर्म ६ मधून एसआयआरशी संबंधित घोषणा हटवली आहे.
त्यामुळे ज्या राज्यांमध्ये मतदार यादीची विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) प्रक्रिया सुरू आहे, तिथेही नवमतदारांना आता ECINet पोर्टलवर फॉर्म ६ आणि एसआयआरची घोषणा स्वतंत्रपणे भरावी लागणार आहे. यापूर्वी एसआयआरशी संबंधित घोषणा फॉर्म ६ मध्येच समाविष्ट होती आणि ती भरणे अर्जदारांसाठी बंधनकारक होते.
निवडणूक आयोगाचे दोन आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी फॉर्म ६ मध्ये एसआयआर घोषणेचा समावेश करण्यास आक्षेप घेतला होता. ही घोषणा नियमानुसार नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच आयोगाने दोन्ही प्रक्रिया वेगळ्या करण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी फॉर्म ६ मध्ये एसआयआर घोषणेसाठी तीन पर्याय देण्यात आले होते. २००० च्या सुरुवातीला झालेल्या मागील एसआयआर प्रक्रियेदरम्यान अर्जदाराचे नाव मतदार यादीत होते का, त्याच्या आई-वडिलांचे किंवा आजी-आजोबांचे नाव यादीत होते का, अथवा यापैकी कोणाचेही नाव नव्हते का, अशी माहिती विचारली जात होती.
या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय अर्जदाराला पुढील प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती. आता ही घोषणा स्वतंत्र करण्यात आली असून त्यासाठी पोर्टलवर वेगळा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. Election Commission SIR:
दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाने हा बदल २१ ऑक्टोबर रोजीच केल्याचे स्पष्ट केले होते. सुरुवातीला दोन्ही प्रक्रिया एकत्र असल्याने अर्जदारांना एकाच ओटीपी आणि ई-सहीद्वारे अर्ज पूर्ण करता येत होता.
मात्र, ऑनलाइन फॉर्म ६ मध्येच एसआयआर घोषणा समाविष्ट केल्यामुळे मूळ अर्जात बदल केल्याचा आभास निर्माण होऊ शकतो, असे आयोगाने मान्य केले. त्यामुळे आता नवमतदारांची नोंदणी आणि एसआयआर घोषणा या स्वतंत्र प्रक्रिया असतील.






