नागपूर – भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चीत झाल्याचे आणि भाजप 240 आणि शिंदे गट 48 जागा लढवणार असल्याचे विधान भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने प्रसिद्ध झाले होते. त्यावर शिंदे गटाकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर आता प्रदेश भाजप अध्यक्ष बावनकुळे यांनी सारवासारव केली आहे.
त्यांनी आता म्हटले आहे की, भाजप पक्ष आणि शिवसेना महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व 288 आणि लोकसभेच्या 48 जागा एनडीएच्या इतर घटक पक्षांसोबत युती करून लढवतील. मात्र जागा वाटपावर अद्याप कोणताही औपचारिक निर्णय झालेला नाही, असे त्यांनी शनिवारी येथे सांगितले.
भाजप विधानसभेच्या 240 आणि शिवसेना 48 जागा लढवणार असा फॉर्म्युला निश्चीत झाला आहे काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता बावनकुळे म्हणाले की, असा कोणताही फॉम्युर्ला निश्चीत झालेला नाही. यासंदर्भात एक बैठक झाली होती आणि भविष्यातही बैठका होतील. या संबंधात आपल्या वक्तव्याची क्लिप फिरवून दाखवली गेली आहे. जागा वाटप अजून अंतिम झालेले नाही असेही बावनकुळे यांनी नमूद केले. जागा वाटपाबाबत केंद्र आणि राज्याचे नेतृत्व निर्णय घेईल असे ते म्हणाले.
Elections 2024 : कॉंग्रेसच्या सहभागाशिवाय विरोधकांची कोणतीही आघाडी अशक्य – जयराम रमेश
बावनकुळे म्हणाले की, ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने भाजप आणि शिवसेनेने 200 जागा जिंकण्याची तयारी सुरू केली आहे.