Satara | महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या

सातारा, (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच दशकांमध्ये शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणासह पश्चिम महाराष्ट्राच्या सिंचन योजना लटकत ठेवल्या.
त्यांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी इतरांना वंचित ठेवण्याचे काम केले. गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात विकासाची जी फळे आहेत ती महायुती सरकारमुळे दिसत आहेत.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मतदार राज्याने जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
भाजपच्यावतीने येथील लेक व्हयू हॉटेलमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी सातारा, जावळी या दोन तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्राचे प्रभारी अजय जामवाल, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सुनील काटकर अविनाश कदम, भरत पाटील, सौरभ शिंदे, रंजना रावत, निशांत पाटील, अशोक मोने, माजी सभापती वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, काँग्रेसने गेल्या 50 वर्षांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या सत्ता विकेंद्रीकरणाला मूठ माती देऊन घराणेशाही सुरू ठेवली आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे निर्णय बरीच वर्ष प्रलंबित राहिले होते.
यशवंतरावांच्या यशवंत विचारांचा विसर काँग्रेसला पडला असून जातीय तेढ निर्माण करण्याचे पाप काँग्रेसने केले आहे.
शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते असताना महाराष्ट्रातील सिंचनाचे रोजगाराचे शिवाय मराठा आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित राहिले.
हे प्रश्न सोडवण्यासाठी पवार यांचा कोणी हात धरला होता का? त्यांच्यावर कोणाचा दडपण होतं का ? असे बरेच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.
शिवरायांचा जनकल्याणाचा सर्व समावेशक विचार केंद्रात भाजपने आणि राज्यात महायुती सरकारने अंमलात आणला आहे.
विरोधकांनी आरोप करताना स्वतः पहिले आत्मपरीक्षण करावे. महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांना आपण भरभरून आशीर्वाद द्यावेत, जेणेकरून महाराष्ट्राची गेल्या पाच वर्षापासूनची प्रगती यापुढेही अखंड सुरू राहील, असे त्यांनी केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, निवडणूक आल्या की विरोधक आमदारकीसाठी बाशिंग बांधून तयार असतात. मात्र, गेल्या पाच वर्षात विकासाचा कोणताही ठोस कार्यक्रम त्यांनी राबवलेला नाही. सत्तेच्या प्रवाहात असतानाही काहींनी केवळ काही न करता आमदारकीसाठी आता दावा ठोकला आहे.
मात्र, गेल्या पाच वर्षात सातारा व जावळी तालुक्यात महायुतीच्या माध्यमातून प्रचंड विकासकामे झाली आहेत. सातारा-जावळीतील जनता ही सतर्क व हुशार असून त्यांनी या विकासकामांचा अनुभव घेतला आहे.
त्यांचा आशीर्वाद हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. त्यामुळे मला माझ्या विजयाची खात्री आहे, आपण हीच विकास कामे सर्वांनी शेवटच्या तळातील माणसापर्यंत पोहोचू या आणि जनतेचे आशीर्वाद घेऊया.
अजय जामवाल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणामुळे भारताला जगात वेगळे स्थान मिळाले आहे. ज्या देशात मोदींना विरोध होत होता त्याच देशांनी आता भारताच्या स्वागतासाठी रेड कार्पेट घातले आहे.
भारताला विश्वगुरू करण्यासाठी अनेक विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. मोदींचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीची सत्ता आली पाहिजे. विकासकामांचा प्रसार व प्रचार आणि शंभर टक्के मतदान कसे होईल यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे,
ते खासदार होऊ देत मी आमदार होतो
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी अनावधानाने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा खासदार म्हणून उल्लेख केला. त्यावेळी दालनात एकच हशा पिकला.
तो संदर्भ पकडून उदयनराजे भोसले यांनी, मला कोणीही विचारले तर मी माझे नाव आमदार शिवेंद्रसिंहराजे सांगतो. त्यांच्यासाठी मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. ते खासदार होऊ देत मी आमदार होतो अशी मिश्किल टिप्पणी केली.
मात्र, शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे हे एकच आहेत कार्यकर्त्यांनी याबाबत काळजी करू नये, असा ठाम विश्वास उदयनराजे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.





