Pune : कोथरूडमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरले

पुणे : पादचारी ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करून चोरट्यांनी त्यांच्याकडील १ लाख २५ हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना कोथरूड भागात घडली.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड भागात राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी दुपारी दोनच्या सुमारास त्या कोथरूडमधील परमहंसनगर भागातून निघाल्या होत्या.
त्या वेळी चोरट्यांनी त्यांना अडवून आमच्या साहेबांना मुलगा झाला आहे. गरजू महिलांना साड्या, धान्य वाटप करण्यात येत आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर तुम्ही गरजू असल्यासारखे वाटायला हवे. तुमच्याकडील दागिने काढून पिशवीत ठेवा, असे सांगत चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले आणि दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटे दागिने चोरून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करत आहेत.




