Ahilyanagar Crime : वृद्ध महिलेची हत्या करून मृतदेह जाळला; अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

मिरी (अहिल्यानगर) : पाथर्डी तालुक्यातील मिरी गावात गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. किसनाबाई छगन मैदड (वय ७५) या वृद्ध महिलेची हत्या करून, गुन्हेगाराने तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या टीमसह ठसेतज्ज्ञ व श्वानपथकासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी तपास करत असताना, मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हेगाराने मृतदेह घरातच जाळून टाकला, पोलिसांनी प्राथमिक तपासात असा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे, घरात कोणत्याही प्रकारची चोरी झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
किसनाबाई यांना एक मुलगी असून, मुलगा व सून यांचे निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात सचिन आणि चेतन ही दोन नातवंडे असून ते कामानिमित्त नगर येथे वास्तव्यास आहेत. मृत किसनाबाई या मिरी येथे शांतपणे आपले आयुष्य व्यतीत करत होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील व पाथर्डी पोलीस करत आहेत.





