प्रभात वृत्तसेवा पुणे – थकित पाणीपट्टी भरण्याची बतावणी करणारा संदेश ज्येष्ठ महिलेला पाठवून बँक खात्यातून सहा लाख ४४ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय महिला नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवून महापालिकेची पाणीपट्टी थकीत असल्याची बतावणी केली. महिलेने संबंधित संदेशात असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्याआधारे चोरट्यांनी महिलेचा मोबाइल संच हॅक करून आर्थिक फसवणूक केली.