पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रसिद्ध हभप शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून 5 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर वारकरी संप्रदायासह महाराष्ट्र हळहळला. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर 32 लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोरे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे त्यांना 32 लाख रुपयांची मदत करणार आहे. आमदार विजय शिवतारे यांना शिंदेंनी काल शिरीष महाराज मोरे यांच्या घरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द करण्यास सांगितले आहे. दरम्यान, आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आर्त विनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती. त्यांच्या याच विनवणीला साद देत संवेदनशील स्वभावाचे नेते अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे.Eknath shinde| चिठ्ठीत 32 लाखांच कर्ज असल्याचा उल्लेख शिरीष महाराज यांनी चार चिठठ्या लिहून ठेवल्या होत्या. पैकी, एका चिठ्ठीत त्यांच्यावर 32 लाखांच कर्ज असल्याचा उल्लेख करत ते कुणाकडून घेतले त्यांच्या नावासह नमूद करण्यात आलं होतं. ‘माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे. पैकी कार विकून 7 लाख फिटतील. वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या. मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकत माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे,’ असे लिहिले होते. तर इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीची ही महाराजांनी माफी मागितली. होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय. पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग’. असं ही चिठ्ठीत नमूद केले होते. लवकरच त्यांचा विवाहसोहळा पार पडणार होता. Eknath shinde| कोणा-कोणाचे होते कर्ज ? शिरीष महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुरानुसार त्यांच्यावर 32 लाख 35 हजारांचे कर्ज होते. मुंबईतील सिंघवजींचे 17 लाखाचे, बचत गटाचे 4 लाखांचे, सोने गहाण ठेवलेले त्याचे 1 लाख 30 हजार, वैयक्तिक कर्ज 2 लाख 25 हजार, चारचाकी वाहन 7 लाखाचे कर्ज आणि किरकोळ देणी 80 हजार असे एकूण 32 लाख 35 हजारांचे कर्ज होते. Eknath shinde| हेही वाचा: एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरचा नवीन मुख्यमंत्री कोण? ‘ही’ नावं चर्चेत